Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अन्नाचा अपमान की माज? ताटातलं अन्न टाकून देण्याचा माजुरडेपणा सर्वत्र का वाढतोय?

अन्नाचा अपमान की माज? ताटातलं अन्न टाकून देण्याचा माजुरडेपणा सर्वत्र का वाढतोय?

Food Wastage Awareness: Social Status and Food Waste: खाऊन मातावे; पण टाकून मातू नये, हे पारंपरिक शहाणपण विसरुन आपण अन्न फेकून देतो, असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2026 15:23 IST2026-05-06T15:00:32+5:302026-05-06T15:23:55+5:30

Food Wastage Awareness: Social Status and Food Waste: खाऊन मातावे; पण टाकून मातू नये, हे पारंपरिक शहाणपण विसरुन आपण अन्न फेकून देतो, असं का?

Food Wastage Awareness Stop Wasting Food Waste Management in Weddings and Parties Rising Culture of Food Wastage Causes and Concerns | अन्नाचा अपमान की माज? ताटातलं अन्न टाकून देण्याचा माजुरडेपणा सर्वत्र का वाढतोय?

अन्नाचा अपमान की माज? ताटातलं अन्न टाकून देण्याचा माजुरडेपणा सर्वत्र का वाढतोय?

Highlightsलग्नातल्या जेवणासाठी खास खास पदार्थ केले जातात. खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स लग्नात लागतात; पण त्या कार्यालयातला लग्नसोहळा पार पडला की एक दृश्य हमखास दिसते. अनेक कार्यालयांच्या एका बाजूला उरलेले अन्न टाकून दिलेले दिसते.

- अश्विनी बर्वे (मुक्त पत्रकार)

लग्नसराई आहे. प्रत्येक कार्यालयासमोर मोठमोठ्या गाड्यांची रांग लागलेली आहेच. लग्न हल्ली धूमधडाक्यात होतात. लग्नातल्या जेवणासाठी खास खास पदार्थ केले जातात. खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स लग्नात लागतात; पण त्या कार्यालयातला लग्नसोहळा पार पडला की एक दृश्य हमखास दिसते. अनेक कार्यालयांच्या एका बाजूला उरलेले अन्न टाकून दिलेले दिसते. बुफेच्या ताटांचा लग्नसोहळ्यातला ढीग पाहा, कितीतरी अन्न ताटात वऱ्हाडींनी टाकलेले असते. (Food Wastage Awareness)
आपल्या ताटांत दररोज पोटभर अन्न असणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे; पण म्हणून आपण दररोज किती अन्न वाया घालवतो याचा कधी जाणीवपूर्वक विचार केला आहे का? अन्न फेकून दिल्याने आपण पर्यावरणाची आणि त्याबरोबर राष्ट्रीय संपत्तीचीसुद्धा किती नासाडी करते, याचे मूल्यमापन आपण कधी केले आहे का? (Food Waste Management in Weddings and Parties)
भूक लागल्यावर ज्यांना सहज अन्न उपलब्ध होते, त्यांना कदाचित या गोष्टीचा त्रास फारसा होणार नाही; पण ज्यांना दिवसातून एकदाही पोटभर जेवण मिळत नाही त्यांचे काय? जागतिक अन्न सुरक्षा आणि हवामानासाठी, कचऱ्यात फेकलेले अन्न हा एक प्राधान्याचा विषय आहे. रस्त्याच्या कडेला पडलेली पोळ्यांची चळत, शाळेच्या भिंतीवर टाकलेला शिळा भात, उरलेल्या भाज्या, आमट्या मोकळ्या प्लॉटवर फेकलेल्या नेहमी दिसतात. खरकटे घालून प्लास्टिकच्या तोंड बांधलेल्या पिशव्या रस्त्यात फेकल्या जातात, त्यांच्याशी झटापट करणारी कुत्री, आंबलेल्या अन्नाची दुर्गंधी, हे चित्र आता शहरांत नाही तर अगदी लहान गावांतही दिसते.


लग्नकार्यात होणारी अन्नाची नासाडी तर आपण सगळेचजण बघतच असतो. उदाहरण सांगते, थोड्या दिवसांपूर्वी एका शाळेच्या मोठ्या मैदानावर एक लग्नसोहळा होता. आठ दिवस आधी सुरू झाली. प्रचंड खर्च करून मोठा सोहळा झाला. ड्रोन कॅमेराने शूटिंग केले जात होते. नवरा-नवरीने विमानातून उतरून एकमेकांना हार घातले. दुसऱ्या दिवशी मात्र त्या मैदानावर चालायला लोकांना जागा उरली नव्हती, इतके टाकून दिलेले अन्न होते. तिथं व्यायामाला येणाऱ्या लोकांनी शेवटी कचरागाडी बोलावली, तो ट्रॅक्टर भरला तरी अन्नाचा ढीग उरलेला होता. दोन दिवस स्वच्छतेचं काम चाललं. अन्नाची इतकी नासाडी करून काय मिळालं असेल?

अन्न का फेकले जाते?

आपण पाहतो त्यापेक्षा अन्नाच्या नासाडीची व्यापकता अधिक आहे. अशी नासाडी होण्यामागची कारणे काय असतील हे समजून घ्यायला हवे. लग्नातच नाही तर घरोघरही हल्ली उरलेले अन्न सर्रास फेकले जाते. आपण सर्वचजण अन्नपुरवठा साखळीचे अंतिम घटक आहोत. बऱ्याचवेळा दुकानामध्ये ऑफर्स आहेत म्हणून खूप काही विकत घेतो. त्या गोष्टींची आपल्याला खरंच गरज आहे का, हे आपण तपासून पाहत नाही. गरज आहे त्यापेक्षा अधिक ताज्या भाज्या, फळं विकत घेतले जातात. तसेच जे पदार्थ लवकर खराब होतील असे वाटत असते ते पदार्थ लवकर संपवत नाहीत. खराब झाले म्हणून मग त्या फेकाव्या लागतात. घरात अन्न शिजवताना गरजेपेक्षा अधिक शिजवले जाते. खूप लोकांच्या घरी सकाळचे अन्न संध्याकाळी खात नाही. दोन्हीवेळा ताजा स्वयंपाक. उरलेले अन्न टाकून दिले जाते. काही घरांमध्ये तर प्रत्येकाची आवड वेगळी असते त्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात. तिसरं म्हणजे पैसा आहे त्यामुळे असाही काहींचा युक्तिवाद असतो की आम्ही आमच्या घरात आमच्या पैशाने काहीही करू कुणाचं काय जातं? पण अन्न फेकणं म्हणजे उपलब्ध नैसर्गिक संसाधनं चुकीच्या पद्धतीनं वापरणं हे लक्षात घेतलं जातं नाही.
अन्नाचा आदर करू..
वाया जाणारे अन्न एखाद्या व्यक्तीची भूक भागवू शकते. गरज असेल तेवढंच खाऊ, अन्न वाया घालवणार नाही.
लग्नसोहळे, पार्ट्या, हॉटेल, घर कुठंही अन्नाचा आदर करू हे तत्त्व स्वीकारलं पाहिजे. अलीकडे काही शहरांत कम्युनिटी फ्रीजचे उपक्रम सुरू झाले आहेत. कॉलनीच्या बाहेर, इमारतीच्या बाहेर एक सार्वजनिक फ्रीज ठेवला जातो आणि तिथं घरात उरलेले अन्न ठेवले जाते. ज्यांना अन्न हवे आहे ते तिथून घेऊन जातात. तसेच काही गावांमध्ये लग्नकार्यालयाच्या ठिकाणी जाऊन उरलेले अन्न गरजूंना दिले जाते; पण एवढेच पुरेसे नाही. मुळातच आपण योग्य प्रमाणातच अन्न शिजवले आणि पानात घेतलेले खाल्ले, जास्त वाढून घेतले नाही तर अन्न वाया जाणार नाही. अन्न वाया न घालवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

आपण किती अन्न वाया घालवतो?

भारतात दरवर्षी सुमारे ६७ दशलक्ष टन अन्न वाया जाते, ज्याची अंदाजे किंमत ९२,००० कोटी रुपये आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २०१८ च्या जुन्या आकडेवारीनुसार मुंबईत दररोज सुमारे ९४०० मेट्रिक टन घनकचरा तयार होतो, त्यापैकी ७३% दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला आणि फळांचा कचरा असतो तर फक्त ३% प्लास्टिक असतो. ashwinibarve2001@gmail.com

Web Title : भोजन की बर्बादी: अपमान या अहंकार? हर जगह भोजन की बर्बादी बढ़ रही है।

Web Summary : भोजन की बर्बादी शादियों और घरों में व्यापक है, जो अधिक खरीदारी, अत्यधिक खाना पकाने और विविध प्राथमिकताओं के कारण होती है। यह संसाधनों का अनादर करता है और भूख को बढ़ाता है। बर्बादी को कम करने के लिए विचारशील खपत और सामुदायिक प्रयासों की आवश्यकता है।

Web Title : Food waste: Insult or arrogance? Food wastage increasing everywhere.

Web Summary : Food wastage is rampant at weddings and homes, driven by over-buying, excess cooking, and varied preferences. This disrespects resources and exacerbates hunger. Reducing waste requires mindful consumption and community efforts like sharing excess food with those in need.