Pati Patni Aur Woh Movie Review | Pati Patni Aur Woh Movie Review : कथा जुनीच, साज नवा

Pati Patni Aur Woh Movie Review : कथा जुनीच, साज नवा

Release Date: December 06,2019Language: हिंदी
Cast: कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर, अनन्‍या पांडे, अपारशक्ति खुराना
Producer: भूषण कुमार, रेणू रवी चोप्राDirector: मुदस्‍सर अजीज
Duration: २ तास ८ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

- तेजल गावडे

१९७८ साली एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर आधारीत बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'पती पत्नी और वो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेतर आपल्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्स असलेले कथानक बऱ्याचदा चित्रपट व मालिकेत पहायला मिळतं. मात्र आता तब्बल ४० वर्षानंतर 'पती पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये जुन्याच कथेला मॉडर्न टच देत मनोरंजक बनवण्यात दिग्दर्शक मुदस्‍सर अजीज यशस्वी ठरले आहेत.

चित्रपटाच्या कथेची सुरुवात कानपूरच्या अभिनव उर्फ चिंटू त्यागी (कार्तिक आर्यन) आणि लखनऊच्या वेदिका त्रिपाठी (भूमी पेडणेकर)च्या अरेंज मॅरेजने होते. हे लग्न दोघांच्या पालकांच्या संमतीने आणि दोघांच्या पसंतीने होते. साधा सरळ असलेल्या चिंटूचे त्याच्या पत्नीवर खूप प्रेम असते. मात्र वेदिका चिंटूकडे दिल्लीला सेटल होण्यासाठी तगादा लावते. त्यामुळे चिंटू त्रस्त असतो. याच दरम्यान चिंटूच्या जीवनात ग्लॅमरस तपस्या सिंग (अनन्या पांडे)ची एण्ट्री होते. तपस्या आल्यामुळे चिंटूच्या जीवनात बहार येते. त्यानंतर कथेत ट्विस्ट येतो ज्यावेळी वेदिका स्वतः चिंटू आणि तपस्याला एकत्र पाहते आणि चिंटू तिच्यासोबत खोटे बोलत असल्याचेही तिला समजते. त्यानंतर चिंटूला पत्नी आणि वोच्या कचाट्यात सापडल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, हे चित्रपटात मजेशीर अंदाजात रेखाटण्यात आलं आहे.

चिंटू त्यागीच्या भूमिकेतून कार्तिक आर्यनने रसिकांच्या मनावर चांगलीच छाप उमटवली आहे. तर पतिव्रता पत्नीची भूमिका भूमीने चोख बजावली आहे. तर अनन्या पांडेचा हा दुसरा चित्रपट असूनही तिने ग्लॅमरस तपस्याची भूमिका सक्षमपणे साकारली आहे. लुका छिपी प्रमाणेच कार्तिक व अपारशक्ती खुराना यांच्यामधील ट्युनिंग या सिनेमातही दिसलं आहे. अपारशक्तीने कार्तिकच्या मित्राची भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे. सनी सिंग सरप्राईज पॅकेजमध्ये दिसणार आहे. त्याचे कार्तिक सोबत सीन नसले तरी त्याची एण्ट्री प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करते. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी भलेही पती पत्नी और वो या चित्रपटाचा रिमेक बनविला असला तरी चित्रपट पाहताना कुठेही कमतरता जाणवत नाही. सुरूवातीला चित्रपट थोडा संथ वाटतो मात्र क्लायमॅक्सला चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरतो. इतकंच नाही चित्रपटाच्या शेवटी पती पत्नीच्या नात्यातील विश्वास किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करण्यात आलं आहे. चित्रपटातील कॉमिक टायमिंग, स्क्रीप्ट, डायलॉग परफेक्ट आहे. चित्रपटातल्या गाण्यांना तर आधीच खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. कॉमेडी आणि रोमांसची मेजवानी असलेल्या हा चित्रपट एण्टरटेन्मेंटचा फुल पॅकेज आहे. पती आणि पत्नीमध्ये 'वो' आल्यानंतर उडणारी मजेशीर तारांबळ पाहण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी पहा.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pati Patni Aur Woh Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.