Motichoor Chaknachoor Movie Review | Motichoor Chaknachoor Movie Review : अभिनयाच्या जोरावर तग धरलेला 'मोतीचूर चकनाचूर'

Motichoor Chaknachoor Movie Review : अभिनयाच्या जोरावर तग धरलेला 'मोतीचूर चकनाचूर'

Release Date: November 15,2019Language: हिंदी
Cast: नवाजुद्दीन सिद्दीकी, अथिया शेट्टी, विभा छिब्बर आणि नवनी परिहार
Producer: राजेश भाटिया, किरण भाटिया, Viacom 18 Motion Pictures Director: देबामित्रा बिस्वाल
Duration: 2 तास 30 मिनिटंGenre:

लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे 

'शादी का लड्डू जो खाये वो भी पछताए जो ना खाये वो भी पछताए' अशी म्हण आपण सगळीकडे सर्रास ऐकतो. याच म्हणीवर आधारित नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टीचा 'मोतीचूर चकनाचूर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाच्या शीषर्कावरुन सिनेमात काय घडणार याची कल्पना आपल्याला बऱ्यापैकी येते मात्र तरीही सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्यावर आथिया आणि नवाजचा कॉमेडी विथ रोमान्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. 

 ही गोष्ट आहे भोपाळमधल्या पुष्पिंदर त्यागी (नवाजुद्दीन सिद्दीकी) आणि अनिता उर्फ ऍनी(आथिया शेट्टी)ची. 36 वर्षीय पुष्पिंदरला लग्नाची घाई झालेली असते. त्याला जाडी, काळी, उंच, मोठी कशीही मुलगी असेल तरी चालेल मात्र त्याला लग्न करायचे असते. त्यासाठी तो दुबईवरुन आलेला असतो पण काही केल्या त्याला मुलगी मिळायला तयार नसते.  तर ऍनीला लग्न करुन परदेशात जायचे असते. परदेशात जाऊन फोटो काढून तिला मैत्रिणींना दाखवयाचे असते. त्यासाठी ती अनेक मुलं रिजेक्ट करतेय. ऍनीला ज्यावेळी कळते की पुष्पिंदर लग्न करण्यासाठी दुबईवरुन आला आहे त्यावेळी दुबईला जाण्यासाठी ती त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक करुन लग्न करण्याचे ठरवते आणि त्यांचे लग्नसुद्धा होते.  पण इकडं पुष्पिंदरला हे माहितचं नसतं की ऍनी त्याच्यासोबत फक्त दुबईला जाण्यासाठी लग्न करते. मात्र कहाणीमध्ये  ट्विस्ट तेव्हा येतो ज्यावेळी पुष्पिंदरला दुबईतल्या नोकरीवरुन काढून टाकल्याचे कळते. यानंतर ऍनी आणि पुष्पिंदरचे लग्न टिकते का ?, ऍनी पुष्पिंदरसोबत दुबईला जाते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागले.

 'मोतीचूर चकनाचूर' हा एक कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमात नवाजच्या वाटेला आलेली भूमिका त्याने चोख बजावली आहे.  पुष्पिंदरच्या भूमिकेत नवाज सहजतेने वावरला आहे. सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे आणि मोतीचूर चकनाचूरमधील पुष्पिंदर त्यागी या दोन्ही भिन्न भूमिका असूनही नवाजनने साकारलेला पुष्पिंदर लक्षवेधी ठरला आहे.  अथिया शेट्टी सरप्राईज पॅकेज म्हणून या सिनेमातून आपल्या समोर आली आहे. भोपाळ मध्ये राहणाऱ्या अनिताची भूमिका अथियाने अतिशय सुरेख साकारली आहे. दोन्ही कलाकारांनी सिनेमात मध्यप्रदेशमधील भाषेचा लहेजा सुंदरपणे सादर केला आहे. अथियाने आतापर्यंत चार सिनेमे केले आहेत पण ऍनीची भूमिका यात उजवी ठरली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याशिवाय प्रत्येक कलाकरांने आपल्या वाटेला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. सिनेमा बघताना देबामित्रा बिस्वालच्या दिग्दर्शनात अनेक उणीवा जाणवतात. सिनेमाचा पूर्वाध जास्त रंजक आहे मात्र उत्तरार्ध सिनेमा संथ होऊन जातो. त्यामुळे तो कंटाळवाणा वाटू लागतो. सिनेमात चांगले कलाकार असतानासुद्धा दिग्दर्शकाला त्याचा फारसा उपयोग करुन घेता आलेला नाहीय. सिनेमाच्या संवादात ही फारसे काही नाविन्य नाही आहे. काही विनोदांवर तर हसायला सुद्धा येत नाही ते जबरदस्तीने टाकल्यासारखे वाटतात. मात्र सिनेमाचे संगीत ही त्याच्या जमेची बाजू आहे. सिनेमातील गाणी ही कथानकासोबत परिस्थिती दर्शवण्यात यशस्वी ठरते. एकूणच काय तर नवाज आणि अथियाच्या अभिनयासाठी हा सिनेमा तुम्ही एकदा पाहू शकता. 
--
 

Web Title: Motichoor Chaknachoor Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.