Jawaani Jaaneman Movie Review | Jawaani Jaaneman Review : नात्यांचे बंध झुगारणारा 'जवानी जानेमन' !

Jawaani Jaaneman Review : नात्यांचे बंध झुगारणारा 'जवानी जानेमन' !

Release Date: January 31,2020Language:
Cast: सैफ अली खान,तब्बू,अलाया फर्नीचरवाला,फरीदा जलाल,चंकी पांडे,कुमुद मिश्रा
Producer: सैफअली खान आणि जैकी भगनानीDirector: नितिन कक्कड
Duration: 2 तासGenre:

लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन
 

आजपर्यंत सिनेमांमध्ये बाप लेकीच्या निरागस भावनिक नात्याला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. अशाच पठडीतला पण तरीही वेगळ्या धाटणीचा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. सैफअली खान, तब्बू आणि अलाया फर्नीचरवाला यांचा 'जवानी जानेमन' सिनेमा हा थोडा हटके आहे. 


लंडनमध्ये या सिनेमाच्या कथानकाला सुरूवात होते. जॅजला (सैफ अली खान) आपले आयुष्य स्वच्छंदीपणाने जगायला आवडते. त्याला आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीचे ओझे नको असते. स्वतःच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे कोणतेच काम त्याला त्याच्या आयुष्यात करायचे नसते. त्यामुळे लग्न, कुटुंब आणि जबाबदारीमध्ये न अडकता तो अय्याशी करणारा एक युवक असतो. दिवसा काम करणे , रात्री दारूच्या नशेत धुंद होऊन क्लबमध्ये जाऊन पार्टी करणे, मुलींचाही त्याला वेगळाच नाद असतो असा तरूण सैफअली खानने साकारला आहे. 


याचदरम्यान सैफअली खानची  मुलगी (टीना) आलया फर्निचरवाला बापाच्या शोधात अॅमस्टरडॅमवरून लंडनला येते आणि क्लबमध्ये ती सैफअली खानला भेटते. जॅजला टीना तिच्या जन्माची कहाणी सांगते आणि त्यावेळी जॅजच तिचा बाप असल्याचे सांगताच त्याच्या पाया खालची जमीनच सरकते. त्याला 21 वर्षाची मुलगी असल्याचे कळताच जॅजला काय करावे हे समजत नाही. टीनाला जॅजच तिचा बाप असल्याचे सिद्ध करायचे असल्यामुळे ती डीएनए टेस्टचा आधार घेते.  मात्र त्याचवेळी डीएनए टेस्ट दरम्यान टीना देखील तिच्या बॉयफ्रेंडपासून गरोदर असल्याचे समजते. त्यानंतर जॅज मुलीला स्विकारतो का? टीना संपूर्ण कुटुंबाला कशाप्रकारे एकत्र आणण्याचे प्रयत्न करते? याची सरमिसळ असलेला हा सिनेमा आहे.  
सिनेमाचे दिग्दर्शक नितिन कक्कडने अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने या  सिनेमाची कथा रूपेरी पडद्यावर मांडली आहे. गंभीर मुद्दा असला तरी हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचा दिग्दर्शकाची प्रयत्न यशस्वी ठरला आहे. सिनेमाच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत कथेतील उत्कंठा, रोमांच कमी होत नाही. तसेच सैफअली खाननेही त्याच्या कारकीर्दीमध्ये अशाप्रकारची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्याची अभिनयाची एक वेगळीच छटा पाहायला मिळते. त्यामुळे सैफअली खानचा हा अंदाजही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो. 


या सिनेमाचे अजून एक  वैशिष्ट्य म्हणजे आलया फर्निचरवालाने या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पहिलाच सिनेमा असला तरी रूपेरी पडद्यावर तिचा वावर बघून ती नवोदित कलाकार असल्याचे कुठेही जाणवत नाही. पूर्ण आत्मविश्वासाने तिने हे भूमिका साकारली आहे. रूपेरी पडद्यावर तिचा ग्लॅमरस अंदाज रसिकांना खिळवून ठेवतो. सिनेमात तब्बू ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. तिच्या वाट्याला आलेली भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी ठरते. याव्यतिरिक्त चंकी पांडे, कुमुद मिश्रा, फरीदा जलाल यांच्याही भूमिका छोट्या असल्यातरी प्रसंगाला साजेशा वाटतात.  सिनेमाचं चित्रीकरण  लंडनमधील आकर्षक लोकेशन्सवर करण्यात आलं असल्यामुळे लोकेशन्सच्याही प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. सिनेमाच्या  संगीतामध्ये नाविन्य नसून तिच एक निराशाजनक बाजू आहे. एकुणच काय तर या आठवड्यात सैफअली खानच्या चाहत्यांसाठी 'जवानी जानेमन' हा सिनेमा नक्कीच चांगली ट्रीट ठरू शकतो.  


 

Web Title: Jawaani Jaaneman Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.