Hotel Mumbai Movie Review | Hotel Mumbai Movie Review : मन सुन्न करणारा 'हॉटेल मुंबई'

Hotel Mumbai Movie Review : मन सुन्न करणारा 'हॉटेल मुंबई'

Release Date: November 29,2019Language: हिंदी
Cast: देव पटेल, अनुमप खेर, आर्मी हेमर, नाजनीन बोनिडी, जेसन आईसेक
Producer: बासिल इवानिक, गॅरी हॅमिल्टन, माइक गॅब्रावी, केंट कुबेना, एंड्रयू ऑगिल्‍वी, मार्क माँटगोमरी, मिन-ली टॅन, जो थॉमस, जूली रयान, ब्रायन हेसDirector: एंथोनी मारस
Duration: 2 तास 3 मिनिटGenre:

लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे 

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसह संपूर्ण देश कधीच विसरु शकत नाही. 9 ते 10 दशहतवादयांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरले होते. याच दहशतवादी हल्यावर आधारित सिनेमा राम गोपाल वर्मानी सर्वात आधी बनवला होता. मात्र या सिनेमाला फारशी पसंती मिळाली नव्हती. यावर एक डॉक्युमेंट्रीसुद्धा आली होती. या डॉक्युमेंट्रीवरुन प्रेरणा घेत दिग्दर्शक एंथनी मारस यांनी 26/11 चा रक्तरंजित थरार मोठ्या पडद्यावर रेखाटला आहे. 26/11 सिनेमा तयार करताना दिग्दर्शकाने प्रत्येक सीन थरारक आणि अत्यंत संवेदनशील पद्धतीने मांडला आहे.  

सिनेमा हॉटेल ताजमध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. ताज हॉटेलमध्ये डेविड डंकन( आर्मी हेमर) त्याची पत्नी (नाजनीन बोनिडी), रशियन व्यवसायिक (जेसन आईसेक) यांच्या सारख्या व्हीआयपी पाहुण्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी होत असते. ताजमधील मुख्य शेफ हेमंत ऑबेरॉय ( अनुमप खेर) आपल्या टीमला त्यासाठी मार्गदर्शन करत असतात. यावेळी त्यांच्या लक्षात येते वेटर अर्जुन (देव पटेल) याने पायात शूज घातले नाहीत म्हणून त्याला घरी जाण्यास सांगतात. मात्र अर्जुनची पत्नी गरोदर आहे आणि त्याला या नोकरीची फारच गरज असल्याचे  सांगून विनवणी करतो. त्यामुळे तो पुन्हा एकदा हेमंत यांच्या टीमचा भाग बनतो.व्हीआयपी पाहुण्याच्या स्वागताची तयारी करत असताना सीएसटी स्टेशन, लियोपोल्ड कॅफे या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालाय याची पुसटशी कल्पनादेखील त्यांना नसते. ज्यावेळी ही माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचते तोवर खूप उशीर झालेला असतो. दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये घूसन नरसंहार करण्यास सुरुवात केली असते. अतिथि देवो भव या वाक्याचा खरा अर्थ त्यादिवशी अर्जुन आणि हेमंत ओबेरॉय सगळ्यांना दाखवून देतात. दोघे मिळून आपल्या हॉटेलमधली प्रत्येक पाहुण्याचा जीव कसा वाचवतात याचा थरार अनुभवण्यासाठी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहावा लागेल.   


ऑस्ट्रेलियन एंथोनी मारस यांनी 'हॉटेल मुंबई' सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 'ताज' हॉटेलच्या आत घडलेला रक्तरंजित थरार पाहताना तुमच्या अंगावर अनेक वेळेला काटा येतो. ही संपूर्ण घटना केवळ दोन तासात मांडायचे शिवधनुष्य त्यांनी पेलले आहे आणि ही परीक्षा ते उत्तम गुणांनी पास देखील झाले आहेत. थरार आणि थ्रिलर दाखवत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी संवेदशनशीलता कुठेच गमावली नाही हे या सिनेमाचे खरं वैशिष्टय आहे. सिनेमा पाहताना एंथोनी मारसचा हा पहिला सिनेमा आहे असे कुठेच भासत नाही. ताजमध्ये फसलेल्या लोकांची गोष्ट, तिथल्या कर्मचाऱ्यांनी साहस दाखवत त्यांना वाचवण्यासाठी केलेला जीवाचा आटापीटा हे दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने मांडलं आहे. सिनेमा सुरु झाल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला बांधून ठेवतो. अनेक सीन पाहताना अश्रू अनावर होतात. या सर्व गोष्टींचे श्रेय दिग्दर्शकालाच जाते. देव पटेल, अनुपम खेर, आर्मी हेमर, जेसन आईसेक,  नाजनीन बोनिडी, विपिन शर्मा या कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय केला आहे. सिनेमातील एका प्रसंगात परदेशी पाहुणीचा जीव वाचवण्यासाठी देव पटेल आपली पगडी काढतो हे दृश्य काळजाला भिडून जाते. अनुपम खेर यांनी देखील आपली भूमिका संयमी आणि संवेदशनशील पद्धतीने उभी केली आहे. सिनेमाचे एडिटींग, सिनेमॅटोग्राफी, संवाद सगळेच दमदार आहे. 26/11 च्या हल्ल्याची नुसती आठवण जरी झाली तरी आपल्या जखमा पु्न्हा ताज्या होतात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ताज आणि तिथला ह्रदयद्रावक प्रसंग मोठ्या पडद्यावर अनुभवायचा असेल त्यांनी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊऩ नक्की पाहा. 

Web Title: Hotel Mumbai Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.