कोकणवासीयांनो स्वागताला तयार व्हा, गणेशोत्सवासाठी मुंबईकर उद्यापासून येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:01 IST2025-08-23T16:01:26+5:302025-08-23T16:01:56+5:30
कोकणात यावर्षी येणार पाच हजार बसेस

कोकणवासीयांनो स्वागताला तयार व्हा, गणेशोत्सवासाठी मुंबईकर उद्यापासून येणार
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईकरांची पावले हळूहळू कोकणाकडे वळू लागली आहेत. कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियाेजन केले आहे. शनिवार (२३ ऑगस्ट) पासून मुंबई व उपनगरातून गाड्या सुटणार असून, रविवारी मुंबईकर कोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसाठी यावर्षी पाच हजार जादा बसेस सोडण्यात येणार असून, रत्नागिरी जिल्ह्यात २५०० पेक्षा जादा गाड्या येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कोकणवासीयांचा आवडता गणेशाेत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोकणात घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने काेकणातील घरे मुंबईकरांच्या येण्याने गजबजून जातात. एसटी, रेल्वे किंवा खासगी वाहनाने मुंबईकर गणेशाेत्सवाला गावी दाखल हाेतात. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २३ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपर्यंत जादा गाड्या काेकणात येणार आहेत.
जवळपास सात ते आठ तासांचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक आगारातील उपाहारगृहातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसे खाद्यपदार्थ, प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मंडणगड ते राजापूर या तालुक्यांत जादा गाड्या येणार असून, आलेल्या सर्व गाड्या त्या-त्या आगारात थांबवून ठेवण्यात येणार आहेत. या गाड्या परतीच्या प्रवासासाठी साेडण्यात येणार आहेत.
- कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा, हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्तीपथके.
- खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्ती पथके.
- भरणे नाका, चिपळूण, हातखंबा तिठा येथे ब्रेकडाऊन व्हॅन असणार.
- जादा गाड्या घेऊन येणारे चालक अन्य जिल्ह्यांतील असल्याने मार्ग दाखविण्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत.
- एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथकही महामार्गावर कार्यरत राहणार आहे.
गणेशभक्तांचे आगमन लवकरच होणार असून, मंडणगड ते राजापूर आगारांत जादा गाड्या येणार आहेत. या गाड्या त्या-त्या आगारात थांबवून ठेवण्याची सूचना संबंधित आगार प्रमुखांना करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी दि. २ सप्टेंबरपासून गाड्या सुटणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी