किल्लेदार कोण? शिंदेसेना की उद्धवसेना; रत्नागिरीच्या बालेकिल्ल्यासाठी लढाई
By मनोज मुळ्ये | Updated: November 14, 2024 17:30 IST2024-11-14T17:29:59+5:302024-11-14T17:30:22+5:30
मनोज मुळ्ये रत्नागिरी : बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. आता किल्लेदार कोण हे ठरवणारी निवडणूक रंगात आली ...

किल्लेदार कोण? शिंदेसेना की उद्धवसेना; रत्नागिरीच्या बालेकिल्ल्यासाठी लढाई
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. आता किल्लेदार कोण हे ठरवणारी निवडणूक रंगात आली आहे. जिल्ह्यातील पाचपैकी चार जागांवर शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेनेत लढत होत आहे आणि प्रत्येक जागा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
भाजप आणि काँग्रेसला जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. चार जागांवर दोन शिवसेनांमध्ये आणि एका जागी दोन राष्ट्रवादींमध्ये लढत होत आहे. १९९० पासून जिल्ह्यात शिवसेनेने आपले वर्चस्व राखले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक असल्याने वचर्स्व टिकवण्यासाठी शिंदे सेना आणि उद्धवसेनेसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट आणि त्यामुळे होणारी मतांची विभागणी हा आताचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा.
- उमेदवारी न मिळालेल्या भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, मतदार काय करणार, हेही महत्त्वाचे ठरणार.
- उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांनी महायुतीमध्ये केलेले ‘पॅचअप’ प्रत्यक्ष तळागाळापर्यंत जाणार का?
- राजापुरात काँग्रेसने केलेली बंडखोरी महाविकास आघाडीच्या इतर जागांवर परिणाम करणार का, हेही महत्त्वाचे ठरणार
- पारंपरिक चिन्हं आणि नवी चिन्हं यामुळेही निवडणुकीमध्ये फरक पडेल, असे चित्र दिसत आहे.
६०.९७% मतदान २०१९ मध्ये विधानसभेसाठी होते.
३२ उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात नशिब आजमावले.
२२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे
विधानसभा मतदारसंघ - मतदान - विद्यमान आमदार - पक्ष - मिळालेली मते
राजापूर - ५५.६५% - राजन साळवी - शिवसेना - ६५,४३३
रत्नागिरी - ५७.८३% - उदय सामंत - शिवसेना - १,१८,४८४
चिपळूण - ६५.८१% - शेखर निकम - राष्ट्रवादी - १,०१,५७८
गुहागर - ५९.३७% - भास्कर जाधव - शिवसेना - ७८,४४८
दापोली - ६६.१९% - योगेश कदम - शिवसेना - ९५,३६४