दापोली केळशी येथून चार लाखांचे चरस जप्त, एकास अटक; वेस्टनावर कोरियन भाषेतील मजकूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:16 IST2025-09-17T16:15:27+5:302025-09-17T16:16:00+5:30
मोठे रॅकेट असण्याची शक्यता

दापोली केळशी येथून चार लाखांचे चरस जप्त, एकास अटक; वेस्टनावर कोरियन भाषेतील मजकूर
दापोली : तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल चार लाख रुपये किमतीचे ९९८ ग्रॅम चरस जप्त केले आहे. या प्रकरणी अबार इस्माईल डायली (वय ३२) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या घराच्या मागील पडवीत हे चरस ठेवण्यात आले होते. तेथेच ही कारवाई करण्यात आली.
दापोलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी घराच्या मागील बाजूस प्लास्टिकच्या पिशवीत संशयास्पद पदार्थ आढळला. हा पदार्थ गडद लाल आणि सोनेरी रंगाच्या वेस्टनात असून, त्यामध्ये हिरव्या रंगाचे दुसरे वेस्टन होते. आतमध्ये तपकिरी रंगाचा, तीव्र वासाचा ९९८ ग्रॅम चरस प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळलेला होता.
लाल रंगाच्या वेस्टनावर ६ GOLD असे इंग्रजी अक्षरात लिहिलेले असून, त्याचबरोबर कोरियन भाषेतील मजकूरही आढळला आहे. हा सर्व अमली पदार्थ पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीसह जप्त करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या अमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे चार लाख रुपये आहे.
या कारवाईसाठी पोलिस निरीक्षक महेश तोरसकर, उपनिरीक्षक यादव, उपनिरीक्षक पाटील, हेडकॉन्स्टेबल मोहिते, ढोले, तसेच कॉन्स्टेबल भांडे, टेमकर, दिंडे आणि एल.पी.सी. पाटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
अमली पदार्थाचा स्रोत, तसेच तो कोणत्या मार्गाने केळशी येथे पोहोचला, याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित मोठा रॅकेट असण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली आहे. दापोली परिसरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.