दापोली पोलीस ठाण्याला आग:..अन् मोठा अनर्थ टळला; पोलीस कर्मचारी गोरे व ढोले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 17:13 IST2022-05-14T16:53:16+5:302022-05-14T17:13:45+5:30
..तर आग पोलीस स्टेशनमधील शस्त्रसाठा असलेल्या रुमला लागली असती.

दापोली पोलीस ठाण्याला आग:..अन् मोठा अनर्थ टळला; पोलीस कर्मचारी गोरे व ढोले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
शिवाजी गोरे
रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोलीचे ब्रिटिश कालीन पोलीस स्टेशनला आज, शनिवारी सकाळी अचानक आग लागली. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केल्याने पोलीस ठाण्यातील महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अंमलदार धोंडू पांडुरंग गोरे व कोमल ढोले यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे या दोघां कर्मचाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
पहाटे साडेसहाच्या सुमारास दापोली पोलीस स्थानकातून अचानक धुराचे लोट येऊ लागले. यावेळी ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदार धोंडू गोरे यांच्या हे लक्षात आले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले अन् भीषण आग लागली. यावेळी ठाणे अंमलदार गोरे यांनी प्रसंगावधान राखत सर्व कर्मचाऱ्यांना सावध करुन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. थोडा जरी विलंब झाला असता तर ही आग पोलीस स्टेशनमधील शस्त्रसाठा असलेल्या रुमला लागली असती. मात्र गोरे यांच्यामुळे मोठी हानी टळली.
तर, महिला पोलीस कर्मचारी कोमल ढोले यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्या सोबत पोलीस स्टेशनच्या छतावर चढून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी आगीच्या झळीत त्या जखमी झाल्या. परंतु जीवाची पर्वा न करता त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे या दोघा कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.