दापोलीत लिफ्टच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नागरिक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:27 IST2025-06-13T14:26:32+5:302025-06-13T14:27:11+5:30
दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात लिफ्टसाठीच्या टाकीत बुडून पाच वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. ...

दापोलीत लिफ्टच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नागरिक संतप्त
दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात लिफ्टसाठीच्या टाकीत बुडून पाच वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. समीर श्रीकांत चव्हाण असे त्याचे नाव आहे. आपल्यासारख्याच लहानग्या भावासोबत खेळता खेळता समीर या टाकीत पडला आणि जगण्याचा आनंद घेण्याआधीच त्याची प्रवासयात्रा संपली.
ठेकेदार आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या चिमुरड्याचा मृत्यू झाला असल्याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत. या प्रकाराची पूर्ण चौकशी व्हावी आणि दोषी लोकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
श्रीकांत काशीनाथ चव्हाण (रा. मंद्रूप सेवालालनगर, सरकारी दवाखान्याजवळ, तालुका जिल्हा सोलापूर) आपल्या दोन मुलांना घेऊन बुधवारी संध्याकाळी सोलापूर येथून निघाले. गुरुवारी सकाळी आठ वाजता ते दापोलीमध्ये पोहोचले. बारा वाजता अन्नदानात जेवणासाठी ते उपजिल्हा रुग्णालयासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बसले. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले तेथे खेळत होती.
उपजिल्हा रुग्णालयासाठी नवी इमारत बांधली जात आहे. त्यातील लिफ्टच्या टाकीमध्ये पावसाचे पाणी साठले आहे. दोन्ही भाऊ खेळता खेळता पाच वर्षांच्या समीरचा तोल गेला आणि तो टाकीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जिवाचा बळी गेल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, सुहानी खानविलकर, तसेच शिंदेसेनेचे शहराध्यक्ष पप्पू रेळेकर व उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
कारवाई न झाल्यास आंदाेलन
या घटनेची नोंद करण्याचे काम पोलिस स्थानकात उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर आंदाेलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.