फोरमच्या लीना गरड यांच्या हातात सेनेचा झेंडा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
By वैभव गायकर | Updated: April 15, 2024 16:21 IST2024-04-15T16:20:07+5:302024-04-15T16:21:24+5:30
दि. 15 रोजी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गरड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

फोरमच्या लीना गरड यांच्या हातात सेनेचा झेंडा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
पनवेल: भाजप मधुन बंडखोरी करून भाजपशी फारकत घेणाऱ्या माजी नगरसेविका व खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. दि. 15 रोजी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गरड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दुहेरी मालमत्ता काराविरोधात गरड यांनी आवाज उठवला आहे. जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त मालमत्ता कर धारक दुहेरी मालमत्ता कराने बाधित आहेत. दुहेरी मालमत्ता काराविरोधात गरड यांनी न्यायालयात देखील धाव घेतली आहे. दुहेरी मालमत्ता कराचा विषय सेना सत्तेत आल्यावर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिल्याने गरड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी गरड यांच्यासोबत मधू पाटील, बालेश भोजने हे कॉलनी फोरमचे समन्वयक देखील उपस्थित होते. या पक्ष प्रवेशावेळी महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, बबन पाटील आदी उपस्थित होते.