Cabinet ministers for Panvel in Navi Mumbai in ministry expands | पनवेलसह नवी मुंबईत मंत्रिपदाचीच चर्चा

पनवेलसह नवी मुंबईत मंत्रिपदाचीच चर्चा

नामदेव मोरे 

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. पक्षाचे तीन अधिकृत व एक बंडखोर उमेदवार विजयी झाला आहे. निवडून आलेले तीनही आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचे बोलले जात असून, पक्षश्रेष्ठी नक्की कोणाला व किती जणांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्तास्थापनेचा पेच असताना नवी मुंबईमध्ये मात्र मंत्रिपदाचीच चर्चा सुरू आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये चार विधानसभेचे मतदारसंघ आहेत. देशातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून या परिसराची ओळख आहे. जेएनपीटी, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तळोजा व रसायनी औद्योगिक वसाहतीसह अनेक मोठे उद्योग या परिसरामध्ये आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही काम सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपचे अस्तित्वही या परिसरामध्ये नव्हते. २०१४ च्या निवडणुकीमध्ये बेलापूर व पनवेलमध्ये भाजपने विजय मिळविला. २०१९ च्या निवडणुकीमध्ये ऐरोलीमधील गणेश नाईक, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, पनवेलमधून प्रशांत ठाकूर भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. उरणमध्ये बंडखोर उमेदवार महेश बालदी विजयी झाले असून, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
पनवेल महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवरही आता त्यांनी वर्चस्व मिळविले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व काँगे्रसचे वर्चस्व असलेल्या परिसरामधील सर्व प्रमुख सत्तास्थाने भाजपने ताब्यात घेतली आहेत. मागील पाच वर्षांमध्ये या परिसरातील कोणालाच मंत्रिपद मिळाले नव्हते. प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले होते. नवी मुंबईमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. विजय चौगुले यांना वडार समाज संघटनेचे अध्यक्षपद, पनवेलमधील बाळासाहेब पाटील यांचीही महामंडळावर वर्णी लावली होती; परंतु प्रत्यक्ष मंत्रिमंडळामध्ये कोणालाही संधी मिळाली नव्हती.

या वेळच्या मंत्रिमंडळामध्ये नवी मुंबई व पनवेलला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्याला मागील पाच वर्षांमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नव्हते. पालकमंत्री पदही जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांवर सोपविण्याची वेळ आली होती. या वेळी जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून, प्रशांत ठाकूर यांची वर्णी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जात आहेत. तिकीटवाटपामध्येही त्यांच्यावरच विश्वास दाखविण्यात आला होता. यामुळे आता त्यांची मंत्रिमंडळातही वर्णी लागू शकते, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमधून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक यांनाही मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी व महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी नाईकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक : ऐरोली मतदारसंघातून ७८ हजार मतांनी विजयी झाले आहेत. १९९० पासून आतापर्यंत पाच वेळा ते विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. १९९५ च्या युती सरकारमध्ये ते मंत्री होते. २००४ पासून सलग दहा वर्षे कॅबिनेट मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. १९९५ पासून नवी मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. राजकारणातील अनुभवामुळे त्यांना संधी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मंदा म्हात्रे : बेलापूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत. १९९५ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका, सभापती, यानंतर विधानपरिषद सदस्य म्हणून कामाचा अनुभव आहे. मागील पाच वर्षांमध्ये अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशांत ठाकूर : पनवेल मतदारसंघातून प्रशांत ठाकूर तब्बल ९२ हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. पनवेल नगरपालिकेमधील नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. नगराध्यक्षपदही भूषविले आहे. सलग तीन वेळा पनवेल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सिडकोचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Cabinet ministers for Panvel in Navi Mumbai in ministry expands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.