Kothrud Vidhan Sabha: कोथरुडमध्ये शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर तिरंगी लढत होणार? आघाडीकडून अजूनही चाचपणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:42 IST2024-10-23T17:42:11+5:302024-10-23T17:42:57+5:30
कोथरूडमध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट इच्छुक असून आघाडी कोणता तगडा उमेदवार देणार याची कोथरुडकरांना उत्सुकता आहे

Kothrud Vidhan Sabha: कोथरुडमध्ये शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर तिरंगी लढत होणार? आघाडीकडून अजूनही चाचपणी सुरु
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कालच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. खडकवासल्यातून सोनेरी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे सुपूत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली. तर हडपसरमधून साईनाथ बाबर आणि कोथरुडमधून किशोर नाना शिंदे यांना निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली. कोथरूडमध्ये किशोर नाना शिंदे हे २००९ आणि २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या नंबरवर राहिले होते. त्यामुळे कोथरुडमध्ये शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार न दिल्याने सस्पेन्स कायम राहणार आहे.
सन २००९ साली कोथरूड विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आला. खरे तर या मतदारसंघावर पहिली मोहोर शिवसेनेेने उमटवली. चंद्रकांत मोकाटे निवडून आले. कोथरूड विधानसभेतून २००९ च्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्या विरुद्ध किशोर नाना शिंदेनी मनसेकडून लढत दिली होती. तेव्हा शिंदे ८ हजारांच्या फरकाने पराभूत झाले होते. त्यानंतर २०१४ साली सुद्धा शिंदे मनसेकडून लढले होते. तेव्हा ते ३ ऱ्या क्रमांकावर होते. आता मागच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांच्या विरुद्ध किशोर शिंदे यांनी लढत दिली होती. तेव्हाही त्यांचा पराभव झाला होता. मात्र ८० हजारांच्या आसपास मतं मिळवून शिंदे २ नंबरवर राहिले होते. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला होता. तिन्ही निवडणुकांमध्ये मनसेला मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळालं आहे. यंदाच्या निवडणुकीतही जोर लावला तर मनसेला चुरशीची लढत देता येईल असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे.
महाविकास आघाडी कोणाला उमेदवार देणार?
आता मनसेने इथे उमेदवार दिला तर लढत तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. त्याचा भाजपला फायदा होईल की तोटा हाही प्रश्न आहे. महाविकास आघाडी अजूनही चाचपडतच आहे. ही जागा कोणाला याचाही निर्णय त्यांना अजून घेता आलेला नाही, उमेदवार जाहीर करणे तर दूरच राहिले आहे. हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी कोणता तगडा उमदेवार या निवडणुकीत उतरवणार? याकडे कोथरुडकरांचे लक्ष लागून आहे.