पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:54 IST2025-12-27T09:51:04+5:302025-12-27T09:54:57+5:30
पिंपरी चिंचवड राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी भाजपाने ताकद लावली आहे.

पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
भाजपाने पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. १२८ जागांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याची धामधूम सुरू असतानाच भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी भाजपा १२५ जागा जिंकणार, तर अजित पवारांना ३ जागा मिळतील, असा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते राहुल कलाटे यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. दुसरीकडे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का असल्याचे मानले जात आहे.
आधी म्हणाले १०० जागा, आता १२५
राहुल कलाटे यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आमदार शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुकीत भाजपा १०० जागा जिंकेल, असे म्हटले होते. कलाटे यांच्या प्रवेशानंतर आता त्यांनी भाजपाला १२५ जागा मिळतील असा दावा केला आहे.
पक्षाचा आदेश अंतिम
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये राहुल कलाटे यांनी समर्थकांसह प्रवेश केला. त्यामुळे भाजपातील इच्छुकांना संधी न मिळण्याची अंदाज व्यक्त केले जात आहे. भाजपामधील कार्यकर्ते नाराज होतील का, या प्रश्नावर शंकर जगताप म्हणाले, "माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल, तर आम्ही त्याच्या पाठीशी राहू. आमच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ. पक्षश्रेष्ठींचा आदेश हा भाजपामध्ये अंतिम मानला जातो. कुणी पक्षात येत असेल, तर त्याचे स्वागतच करू."