Ajit Pawar: "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 22:07 IST2024-12-22T22:06:56+5:302024-12-22T22:07:34+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला इशारा.

Ajit Pawar: "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार"
लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती : "बीड जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेची न्यायालय आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेमागील ‘मास्टरमाइंड’चा शोध घेतला जाईल. कोणीही असू द्या, त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, मुख्यमंत्र्यांसह आम्ही तिघांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथील घटनेबाबत इशारा दिला.
बारामतीकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सलग आठव्यांदा निवडून आल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शारदा प्रांगण येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, "शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.देशमुख यांना अमानुषपणे मारण्यात आल्याचे त्यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्या अमानुष लोकांना फाशी झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी फास्टट्रॅक खटला चालविण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्यांना सोडणार नाही. परभणी येथील घटनेबाबत देखील सरकाने लक्ष घातले आहे. ते कुटुंब उघड्यावर पडू दिले जाणार नाही," असे पवार म्हणाले.
बारामतीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांबाबत अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाचा तरुण पिढीकडून होणारा वापर चिंताजनक आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलामुलींकडे लक्ष द्यावे. मुलांबरोबर संवाद साधावा. आपली नवीन पिढी चुकीच्या रस्त्याने जाता कामा नये, असे पवार म्हणाले.
यावेळी खासदार सुनेत्रा पवार,पार्थ पवार,आमदार अमोल मिटकरी,पक्ष निरीक्षक सुरेश पालवे,निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,जय पाटील,राजवर्धन शिंदे ,केशवराव जगताप,संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
बारामतीत काम करणाऱ्या अधिकार्यांनी माझ्या गतीने काम करण्याची तयारी ठेवावी. अन्यथा जमत नसल्यास बदली करुन दुसऱ्या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवावी. काम करा,अन्यथा त्यांना बदलून जाण्याची मुभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
"बारामती आता देशात क्रमांक एकचे शहर बनविणार"
"यंदा बारामतीकरांनी ऐतिहासिक करिश्मा घडवून आणला. बारामतीच्या माझ्या आमदारकीच्या ७ ‘टर्म’ पाहिल्या. त्या एकूण काळात झालेल्या विकासापेक्षा अधिक विकास यंदा आठव्या ‘टर्म’मध्ये करुन बारामतीचा पूर्ण कायापालट करणार आहे. बारामतीशी इमान राखत राज्यात काम करताना जीवाचे रान करू, राज्यात क्रमांक एकचे शहर अशी ओळख असणारी बारामती आता देशात क्रमांक एकचे शहर बनवण्यासाठी नियोजन करणार, बारामतीचा जिरायती शब्द कायमचा पुसणार," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत १ लाखांपेक्षा मिळालेल्या मताधिक्क्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांचे कौतुक केले.
दरम्यान, राज्यातील घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील मिरवणूक आपण रद्द केली. राज्यात अशा घटना घडलेल्या असताना आपण हारतुरे घेणे बरोबर नसल्याने मिरवणूक रद्द केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.