Devendra Fadnavis: आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 19:19 IST2024-09-16T19:18:25+5:302024-09-16T19:19:23+5:30
पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे देवेंद्र फडणीस यांनी सांगितले आहे

Devendra Fadnavis: आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
पुणे: पुण्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. आता तर दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. कोणालाही कसलीच भीती राहिली नसल्याचे दिसून आले आहे. वनराज आंदेकर खून प्रकरण त्यानंतर झालेला व्यावसायिकावरील गोळीबार, कोयत्याने वार, गटांमध्ये वाद होऊन मृत्यू अशा घटनांमुळे पुणे शहर हादरले आहे. याबाबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तत्काळ शोधून काढतो, ठोकून काढतो, जेलमध्ये टाकतो. त्यामुळे पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पुणे-हुबळी आणि पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे स्थानकावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठीच्या तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय उत्तम आणि अत्याधुनिक सुविधा असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. धनगर आरक्षण संदर्भात काल बैठक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून रोड मॅप बनवला आहे. मी दुसऱ्या बैठकीत असल्याने त्या बैठकीला नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या दिशेने पुढे चाललो आहोत.