Devendra Fadnavis: लाडक्या बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना आम्ही चपराक दिली - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 17:54 IST2024-11-18T17:51:51+5:302024-11-18T17:54:20+5:30
लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी उच्च न्यायालयात गेले. मात्र त्याठिकाणी सुद्धा सावत्र भावांची फजिती झाली

Devendra Fadnavis: लाडक्या बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना आम्ही चपराक दिली - देवेंद्र फडणवीस
दौंड : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना आम्ही कामातून चपराक दिली आहे. कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वरवंड (ता. दौंड) येथे भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सांगता सभेत ते बोलत हाेते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार यात दुमत नाही. आमचे सरकार आल्यास कर्जमुक्त तसेच वीजबिलमुक्त शेतकरी हा पॅटर्न राबवणार आहोत. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा विरोधकांनी खूप टीका केली की, ही योजना बंद पडेल. परंतु, मी तुम्हाला एक सांगतो, विरोधकांच्या नाकावर टीच्चून लाडकी बहीण योजना सुरू आहे. आमच्या सरकारमध्ये आता या योजनेत बदल करून पंधराशे रुपयांऐवजी २,१०० रुपये लाडक्या बहिणींना देणार आहोत. लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी उच्च न्यायालयात गेले. मात्र, आम्ही या ठिकाणी योग्य रितीने पाठपुरावा केल्यामुळे सावत्र भावांची फजिती झाली. परिणामी ही योजना सुरू ठेवण्याचा निकाल झाला.
राहुल कुल अभ्यासू आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा माणूस आहे. राहुल कुल यावेळेस रेकॉर्ड करणार आहेत. दौंडकरांनी मला आमदार द्यावा, मी तुम्हाला मंत्री देतो, असे सांगत कुल यांना २० हजारांच्यावर निवडून दिल्यास कॅबिनेट, तर २० हजाराच्या आत निवडून दिल्यास राज्यमंत्री केलं जाईल, याचा विचार मतदारांनी करावा, कारण हे आता तुमच्या हातात आहे. आम्ही राहुल कुल यांना मंत्री करायचं ठरवलं असून, कुल यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
राहुल कुल म्हणाले, दौंड तालुक्यात औद्योगिक वसाहत, शिक्षण संकुल यासह अन्य काही प्रकल्प उभे राहिले पाहिजेत. यासाठी देवेंद्र फडणवीस निश्चितच मदत करतील. कारण विकास हाच केंद्रबिंदू समजून कामकाज करीत आहे, असा विश्वास कुल यांनी व्यक्त केला.