विक्रेत्यांना ठेवावी लागणार पीओपीच्या मूर्तीची नोंद; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिकेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:46 IST2025-08-19T11:45:22+5:302025-08-19T11:46:00+5:30
पीओपीच्या सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करावे

विक्रेत्यांना ठेवावी लागणार पीओपीच्या मूर्तीची नोंद; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिकेचे आवाहन
पुणे : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीबाबत सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीओपी मूर्ती बनविणारे मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांना मूर्तीची विक्री करताना त्याची नोंद ठेवणे आणि मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्टपणे दिसेल, अशा स्वरूपात ऑईल पेंटने लाल रंगाचे गोलाकार चिन्ह करणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होण्यासाठी महापालिकेने विविध उपाय योजना आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. यासंदर्भात महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे पीओपी मूर्तीसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पीओपीच्या सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करावे, सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मूर्तींऐवजी प्रतीकात्मक स्वरूपात लहान मूर्तीचे विसर्जन करावे, मोठ्या मूर्तीचा वापर पुढील वर्षी करावा. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर ती मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करावी, मात्र ती शाडू माती, चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्च्या मालाची असावी, मूर्तीचे दागिने बनविण्यासाठी वाळलेली फुले, पेंढा इत्यादीचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सची चमकदार सामग्री वापरावी, मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल रंग, जैव विघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा, नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.