Pune Municipal Corporation: यंदा पुणे महापालिकेचे इतिहासात सर्वाधिक उत्पन्न, तरीही साडेतीन हजार कोटींची तूट, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:53 IST2026-04-01T15:48:05+5:302026-04-01T15:53:53+5:30
Pune Municipal Corporation महापालिका आयुक्तांनी २०२५-२६ वर्षासाठी महापालिकेचे १२ हजार ६१८ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यापैकी ३० मार्चअखेरपर्यंत ९ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे

Pune Municipal Corporation: यंदा पुणे महापालिकेचे इतिहासात सर्वाधिक उत्पन्न, तरीही साडेतीन हजार कोटींची तूट, नेमकं कारण काय?
पुणे : सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नाने ९ हजार कोटींचा टप्पा पार केला असून महापालिकेच्या इतिहासातील हे सर्वाधिक उत्पन्न आहे. असे असले तरी महापालिकेच्या अंदाजपत्रकात साडेतीन हजार कोटी रुपयांची तूट आली आहे.
महापालिका आयुक्तांनी २०२५-२६ वर्षासाठी महापालिकेचे १२ हजार ६१८ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यापैकी ३० मार्चअखेरपर्यंत ९ हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून, ३१ मार्च रोजी सुटी असली तरी ऑनलाइन पेमेंट करता येणार असल्याने पालिकेचे उत्पन्न ९ हजार २०० कोटींचा टप्पा पार करण्याचा अंदाज आहे. मिळकत करातून २ हजार ९८५ कोटी, जीएसटीमधून ३ हजार कोटी, गतवर्षीच्या तुलनेने बांधकाम विभागाचे उत्पन्न कमी होऊन बांधकाम परवानगीतून सुमारे २००० ते २२०० कोटी, पाणीपट्टीमधून सुमारे २०० कोटी, मुद्रांक शुल्कातून १०० ते १५० कोटी, तर शासकीय अनुदान आणि इतर मधून ६०० कोटी असे महापालिकेचे उत्पन्न ९ हजार कोटींच्या पुढे गेले आहे.
बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले
भूमिअभिलेख विभागाने वहिवाटीची मोजणी बंद केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी तात्पुरते रेखांकन करून देण्याचे निर्देश दिले आहेत; पण तात्पुरते रेखांकन करणे ही पालिकेची जबाबदारी नाही, अशा स्वरूपाच्या मोजण्या भूमिअभिलेख विभागाकडून नाकारल्या जात आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेकडे परवानगीसाठी येणाऱ्या बांधकाम प्रकल्पांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नावर झाला आहे.
वर्ष - महापालिकेचे अंदाजपत्रक - प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्न
२०२०-२१ - ६ हजार २३९ कोटी - ४ हजार ७१३ कोटी
२०२१-२२ - ७ हजार ६५० कोटी - ६ हजार ८०६ कोटी
२०२२-२३ - ८ हजार ५९२ कोटी - ७ हजार १०० कोटी
२०२३-२४ - ९ हजार ५१५ कोटी - ८ हजार २६० कोटी
२०२४-२५ - ११ हजार ६०१ कोटी - ८ हजार २७२ कोटी
२०२५-२६ - १२ हजार ६१८ कोटी - ९ हजार २०० कोटी
