पानशेतच्या पुरात भक्कम उभा अन् पानिपतची भळभळती जखम लपवणारा 'लकडी पूल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 08:00 PM2022-11-23T20:00:25+5:302022-11-23T20:00:37+5:30

सन १८९३ मध्ये याच पुलावरून पुण्यातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची पहिली सार्वजनिक मिरवणूक गेली

The wooden bridge that stands strong in Panshet flood and hides the burning wounds of Panipat | पानशेतच्या पुरात भक्कम उभा अन् पानिपतची भळभळती जखम लपवणारा 'लकडी पूल'

पानशेतच्या पुरात भक्कम उभा अन् पानिपतची भळभळती जखम लपवणारा 'लकडी पूल'

googlenewsNext

राजू इनामदार

पुणे : पानिपतचे युद्ध मराठी माणूस कधीच विसरणार नाही. त्या युद्धातून पराभूत होऊन पुण्यात येताना मराठी सैनिकांना लाजल्यासारख होत होते. कारण शनिवारवाड्यासमोरून नेहमीच विजयी सैन्य वाजतगाजत यायचे, मग त्यांचे शनिवारवाड्यात स्वागत व्हायचे. त्यामुळेच पानिपतावरून पुण्यात परतताना त्यांना नको नको व्हायचे. नानासाहेब पेशव्यांनी त्यांची ही व्यथा जाणली आणि त्यांच्यासाठी पुण्यात मागच्या दाराने प्रवेश करू देणारा एक पूल बांधला. तोच हा लकडी किंवा लाकडी पूल. साल होते १७६१.

लागले ४५ हजार ६०० रुपये

पुण्यातील हा सर्वात जुना पूल. आता त्याला छत्रपती संभाजी पूल म्हणतात. पहिल्यांदा बांधला त्यावेळी तो लाकडाचाच होता. कारण त्याची निकडच तशी होती. नंतर कधीतरी तो कोसळला असावा. इंग्रजांनी मग सन १८४० मध्ये चिरेबंद दगडी कमानींचा नवीन पूल बांधला. त्यासाठी त्यावेळी ४५ हजार ६०० रुपये लागले. त्यामधील ६०० रुपये ठेकेदाराने वाचवले. त्यातले १० हजार रुपये इंग्रजांनी पुण्यातूनच कर रूपाने जमा केले होते.

भक्कमपणा आजही कायम 

सन १८९३ मध्ये याच पुलावरून पुण्यातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची पहिली सार्वजनिक मिरवणूक गेली. तत्कालीन पुणे नगरपालिकेने सन १९२९ मध्ये त्याला दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ८ फूट रुंदीचे प्रशस्त पदपथ केले. त्यामुळे पुलावरून पुलाच्या कडेने पुणेकरांना पायी फिरता येऊ लागले. सन १९५० मध्ये त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. त्याचवेळी बहुधा त्याचे छत्रपती संभाजी पूल असे नामकरणही झाले. १२ जुलै १९६१ च्या पानशेतच्या पुरात सर्वाधिक नुकसान याच पुलाचे झाले; पण पाण्याच्या इतक्या मोठ्या लोंढ्यातही तो टिकून राहिला. कोसळला नाही. आजही त्याचा भक्कमपणा कायम आहे.

वैशिष्ट्ये काय?

- लकडी पुलाची सुरेख दगडी कमानींची रचना, त्यावरचा दोन्ही बाजूंना असलेला प्रशस्त पादचारी मार्ग आजही पाहावा असाच आहे.
- शहरातील हा सर्वाधिक गर्दीचा पूल. वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठीही. जुन्या पुणेकरांना त्यावरील रम्य सायंकाळ आठवत असेल. आता गर्दी होत असली तरी आजही ती तितकीच रम्य आहे.
- या पुलाने पूर्व पुण्याचा पश्चिम पुण्याशी चांगलाच सांधा जुळवला. कोथरूडकरांसाठी तर मध्य पुण्यात येण्याचे प्रवेशद्वारच आहे हा पूल.
- आता पानिपतची जखम नाही, तर विसर्जन मिरवणुकीतील गमतीची आठवण छत्रपती संभाजी महाराज पूल करून देत असतो.

हा पूल पुण्याचे खरोखरच वैभव 

''छत्रपती संभाजी पुलाच्या अगदी सुरुवातीला एका गवळणीचे शिल्प होते. बऱ्याच वर्षांपूर्वी ते काढले. आता झेड ब्रीजच्या सुरुवातीला बसविले गेले आहे. आमच्या विठ्ठल मंदिराचे नाव लकडी पूल व पुलाचे नावही लकडी पूल. स. गो. बर्वे आयुक्त असताना पुलाची रुंदी वाढवली ते काम मी पाहिले आहे. हा पूल पुण्याचे खरोखरच वैभव आहे. - दिलीप काळभोर, अध्यक्ष, लकडी पूल विठ्ठल मंदिर विश्वस्त मंडळ'' 

Web Title: The wooden bridge that stands strong in Panshet flood and hides the burning wounds of Panipat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.