"अजून ७० हजार कोटींचा निकाल लागलेला नाही, आम्ही मागची पानं चाळली तर त्यांना...", अजित पवारांना बावनकुळेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:14 IST2026-01-06T16:11:42+5:302026-01-06T16:14:03+5:30
Ajit Pawar vs BJP: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यामध्येच जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. अजित पवारांनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपाच्या भूमिकेवरच वार केला.

"अजून ७० हजार कोटींचा निकाल लागलेला नाही, आम्ही मागची पानं चाळली तर त्यांना...", अजित पवारांना बावनकुळेंचा इशारा
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणाने डोकं वर काढले आहे. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सरकारमध्ये बसलो आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपाची कोंडी केली. त्यामुळे भाजपा नेतेही आक्रमक झाले. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना थेट इशाराच दिला. "७० हजार कोटींच्या सुनावणीचा अजून निकाल लागलेला नाही", असे विधान बावनकुळेंनी केले.
माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "ठीक आहे, हे काही अभिमानास्पद नाही. न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल काय येईल, त्यावर आपण पुढे जाऊ. शेवटी केस विचाराधीन आहे. अजून निकाल लागलेला नाही."
'खूप बोलता येईल, पण ही ती वेळ नाही'
"अजितदादा प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या बाबी बाहेर काढणे आणि एका महापालिकेसाठी महायुतीत मनभेद निर्माण करू नयेत. हे योग्य नाही. अजितदादा याचा विचार करतील. खूप बोलता येईल, मात्र ही ती वेळ नाहीये", असा इशारा बावनकुळेंनी अजित पवारांना दिला.
"अजित पवारांनी जसे ठरले आहे, तसे वागावे"
बावनकुळे असेही म्हणाले की, "अजितदादांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. महायुतीत मनभेद आणि मतभेद निर्माण होईल असे बोलायचे नाही, असे महायुती समन्वय बैठकीत ठरले होते. तरी ते असे का वागले, असे का बोलले, याची मला कल्पना नाही. पण, त्यांनी असे बोलायला नको होते."
"अजित पवार राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत. मी त्यांना फार सल्ला देणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये ते बरीच वर्षे सत्तेत होते. आता आम्ही मागची पाने पलटली, चाळली तर त्यांना काही बोलता येणार नाही. मागची पाने उलटायची आमची इच्छा नाही. त्यामुळे अजित पवारांनी समन्वय समितीत ठरले तसे वागावे", असे बावनकुळे म्हणाले.