... ‘अशा ’ प्रकारे मावळात विसावल्या एकाच म्यानात दोन तलवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:12 IST2019-04-08T20:09:14+5:302019-04-08T20:12:34+5:30
गैरसमजातून प्रश्न निर्माण झाले होते. मतभेद होते, मनभेद नव्हते, असे भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सांगितले..

... ‘अशा ’ प्रकारे मावळात विसावल्या एकाच म्यानात दोन तलवारी
पिंपरी : लोकसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर मावळ लोकसभा निवडणूकीतीलशिवसेना भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांत दिलजमाई झाली आहे. राजकीय दृष्टीकोनातून आरोप केले होते, कोणतेही वितुष्ट नव्हते, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गैरसमजातून प्रश्न निर्माण झाले होते. मतभेद होते, मनभेद नव्हते, असे भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. त्यानंतर दहा वर्षांपासून असणाऱ्या बारणे आणि जगताप यांच्यात दिलजमाई झाली. गळाभेटही घेतली.
लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना भारतीय जनता पक्षात युती झाली असली तरी गेल्या महिनाभरापासून खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यात युती झाली नव्हती. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय राऊत यांनी चर्चो करूनही मनोमिलन झाले नव्हते.
रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारणे आणि जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनी मिळून आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी उमा खापरे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, निवडणूक देशहिताची आहे, हेवेदावे बाजूला ठेवून पुढे जायचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मला काही सूचना केल्या. गेल्या दहा वर्षांत कालावधीत केलेले आरोप हे राजकीय दृष्टीकोनातून केलेले होते. आमदार आणि माझ्यात कोणतेही वितुष्ट नव्हते. याबाबतचे आरोप मागे घेत आहे.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, आम्ही आत्मपरिक्षण केले. आपण दुसऱ्याची चूक काढतो. त्यावेळी अनेक पश्न पडतात. मात्र, स्वत:ची चूक शोधायला जातो. त्यावेळी खूप मोठ्याप्रमाणावर प्रश्न सुटतात. गैरसमजामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आमच्यात मतभेद होते, मनभेद नव्हते. युतीसाठी, देशासाठी काम करायचे आहे.