Sucide In Pune: पुण्यातील धक्कादायक घटना! आई आणि मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 17:36 IST2022-01-14T17:36:05+5:302022-01-14T17:36:32+5:30
आईचे आजारपणामुळे हाल होत आहेत. तिची अवस्था पाहवत नाही,’ असे मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे

Sucide In Pune: पुण्यातील धक्कादायक घटना! आई आणि मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागात आई आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आईचे आजारपणामुळे हाल होत आहेत. तिची अवस्था पाहवत नाही,’ असे मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.
संगीता दत्तात्रय खपाले (वय ५०), मुलगी रेखा (वय २८, दोघी रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. गेल्या काही वर्षांपासून संगीता या आजारी होत्या. त्यांची देखभाल मुलगी रेखा करायची. संगीता, रेखा आणि त्यांचा मुलगा किरकिटवाडी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत हाेते. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला असून, ती खडकवासला भागात राहायला आहे. संगीता आजारी असल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. संगीता किरकोळ कामे करून संसार चालवित होत्या. आजारपणामुळे संगीता तसेच त्यांची मुलगी रेखा नैराश्यात होते. आजारपणामुळे संगीता कामही करत नव्हत्या.
मध्यरात्री संगीता आणि रेखा यांनी स्वयंपाकघरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा मध्यरात्री स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेला. तेव्हा आई आणि बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती हवेली पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. रेखाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे. ‘आईचे आजारपणामुळे हाल होत आहेत. तिची अवस्था पाहवत नाही,’ असे रेखाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. याप्रकरणी हवेली पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक मोहिते तपास करत आहेत.