शारदा गजाननाला विविध पालेभाज्यांची आकर्षक सजावट; २ हजार गड्ड्यांनी सजला ‘श्रीं’ चा गाभारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:05 IST2025-09-03T17:05:44+5:302025-09-03T17:05:58+5:30

मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदींमार्फत ही आरास करण्यात आली

Sharda Gajanana decorated with various leafy vegetables; 'Shri''s'' hall decorated with 2,000 pots | शारदा गजाननाला विविध पालेभाज्यांची आकर्षक सजावट; २ हजार गड्ड्यांनी सजला ‘श्रीं’ चा गाभारा

शारदा गजाननाला विविध पालेभाज्यांची आकर्षक सजावट; २ हजार गड्ड्यांनी सजला ‘श्रीं’ चा गाभारा

पुणे : पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिराची प्रतिकृती असलेल्या मंदिरात विराजमान झालेल्या गुलटेकडी मार्केटयार्डातील श्री शारदा गजाननाला मंगळवारी २२ प्रकारच्या विविध पालेभाज्यांची आकर्षक सजावट करून आरास करण्यात आली. ‘श्रीं’च्या मूर्तीसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि विठ्ठल-रुक्मिणी समोर करण्यात आलेल्या आरासमुळे हिरव्या, पांढऱ्या, लाल रंगाच्या फळ व पालेभाज्यांमध्ये मूर्ती लक्ष वेधून घेत होती. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दर्जेदार पालेभाज्यांच्या सुमारे दोन हजार गड्ड्यांनी ‘श्रीं’च्या मूर्तींना सजविण्यात आले होते.

भाद्रपदातील दशमीच्या मुहूर्तावर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात आवक होणाऱ्या मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदींमार्फत ही आरास करण्यात आली. कोथिंबिरीच्या ७५, तर अन्य पालेभाज्यांच्या ५० ते ५५ गड्ड्यांचा वापर यामध्ये करण्यात आला. मार्केट यार्डातील पालेभाज्यांचे अडतदार राजेंद्र सूर्यवंशी यांच्यावतीने ही आरास करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश घुले, मंडळाचे अध्यक्ष युवराज मुजुमले, मैत्री ट्रेडिंग कंपनीचे राजेंद्र सूर्यवंशी, नितीन जामगे, प्रकाश ढमढेरे, महेंद्र केकाने, विजय ढमढेरे, लिंबाचे अडतदार रोहन जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते.

सूर्यवंशी म्हणाले, वर्षभर शेतकरी मेहनतीने शेतात राबून पालेभाज्या पिकवतो. त्याच पालेभाज्या यंदा गणेशोत्सवात मंदिरात बाप्पा चरणी अर्पण करण्यात आल्या. तसेच बळीराजा सुखात राहू देत, अशी प्रार्थनादेखील करण्यात आली. दरम्यान, या पालेभाज्यांनंतर गरजवंतांना प्रसाद म्हणून देण्यात येणार असल्याचेही सांगितले. गणरायाचे मनोहारी रूप पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरिता सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 

Web Title: Sharda Gajanana decorated with various leafy vegetables; 'Shri''s'' hall decorated with 2,000 pots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.