गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:22 PM2024-04-11T17:22:02+5:302024-04-11T17:28:25+5:30

Baramati Lok Sabha: मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आणि गावपुढारीही अजित पवारांसोबत दिसत असल्याने शरद पवार यांच्यासमोरील आव्हान खडतर झाल्याचं दिसत आहे. मात्र ही कोंडी फोडण्यासाठी पवारांनी आपल्या हुकमी मार्गाचा पुन्हा एकदा वापर सुरू केला आहे.

Sharad Pawar started using old tactics to campaign for Supriya Sule After local leaders going with Ajit Pawar in baramati lok sabha | गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला!

गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला!

अक्षय शितोळे

Sharad Pawar Vs Ajit Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगणार असल्याने या मतदारसंघाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. बारामती मतदारसंघाच्या मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या आणि यंदा महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सु्प्रिया सुळे यांना कुटुंबातूनच आव्हान मिळालं असून त्यांच्या भावजय व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. उमेदवार म्हणून जरी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मैदानात असल्या तरी खरा सामना हा अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातच होणार आहे. असं असताना या लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच तालुक्यांमधील महत्त्वाचे नेते आणि गावपुढारीही अजित पवारांसोबत दिसत असल्याने शरद पवार यांच्यासमोरील आव्हान खडतर झाल्याचं दिसत आहे. मात्र ही कोंडी फोडण्यासाठी पवारांनी आपल्या हुकमी मार्गाचा पुन्हा एकदा वापर करण्याचं निश्चित केल्याचं दिसत आहे. 

तळागाळापर्यंत असणारा लोकसंपर्क हे शरद पवारांच्या राजकीय यशाचं गमक मानलं जातं. गावखेड्यात सभा सुरू असताना अचानक गर्दीतील व्यक्तीला नावानिशी हाक मारत पवार आपल्या स्मरणशक्तीने सर्वांनाच विस्मयचकित करतात. पक्षफुटीनंतर निर्माण झालेलं राजकीय संकट आणि अजित पवारांच्या पत्नीच्या उमेदवारीच्या रुपाने बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत उभं राहू पाहणारं आव्हान मोडून काढण्यासाठी शरद पवार आता पुन्हा मैदानात उतरले असून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत थेट सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्यास सुरुवात केली आहे. पवार यांनी नुकताच बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याने शरद पवारांच्या दौऱ्यापासून अनेक गावपुढारी बाजूला राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र छोट्या-छोट्या सभा घेत पवारांनी गावगाड्यातील नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी पवारांनी भाषणातून अगदी आपल्या पहिल्या निवडणुकीचा उल्लेख करत जु्न्या आठवणींना उजाळा दिला, वर्तमानातील राजकीय आव्हानाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला अन् नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीचा शब्दही दिला. 

शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार, सुपे आणि आसपासच्या भागातील दुष्काळाची स्थिती जाणून घेतली. यावेळी अजित पवारांना लक्ष्य करताना त्यांनी म्हटलं की, "मी विश्वासाने काही लोकांवर इथली जबाबदारी सोपवली होती, मात्र पाण्याबाबतचे तुमचे काही प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आलं, आता यापुढे मी स्वत: या प्रश्नात लक्ष घालणार आहे." एकीकडे लोकांच्या प्रश्नावर बोलत असताना शरद पवार यांनी  दुसरीकडे राजकीय स्थितीवरही भाष्य केलं. "आमचा संघर्ष भाजपसोबतच आहेच, पण आमच्यातून जे बाहेर  गेले, दुर्दैवाने आमचा संघर्ष त्यांच्याशीही आहे," असं म्हणत अजित पवारांविरोधात आपल्याला ताकदीने लढायचं असल्याचा संदेशही त्यांनी उपस्थितांना दिला.

दरम्यान, बारामतीच्या शेजारीच असणाऱ्या दौंड तालुक्यात जाताना शरद पवार यांनी रस्त्यात येणाऱ्या विविध गावांमध्ये आपला ताफा थांबवत सत्कार करण्यासाठी उभ्या असणाऱ्या वयोवृद्ध जुन्या सवंगड्यांची विचारपूसही केली. त्यामुळे एकीकडे तालुका पातळीवरील मोठे नेते, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक आलेले पुढारी हे अजित पवारांसोबत गेल्यानंतर शरद पवारांनी सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळत त्यांना साद घालण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांमधील राजकीय स्थिती काय?

१. बारामती

उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून बारामती विधानसभा मतदारसंघातूनच आमदार म्हणून निवडून येत असल्याने येथील राजकारणावर त्यांची घट्ट पकड आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर बहुतांश पुढारी अजित पवारांसोबतच आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि धनगर समाजात चांगला संपर्क असणारे विश्वास नाना देवकाते यांचाही समावेश आहे.

२. इंदापूर

इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांची ठामपणे साथ दिली आहे. तर त्यांच्याविरोधात मागील दोन निवडणुकांमध्ये पराभूत झालेले हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये असले तरी महायुतीचा घटक म्हणून तेही अजित पवार यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचाच प्रचार करणार, हे सध्या तरी दिसत आहे. भरणे आणि पाटील कुटुंबाव्यतिरिक्त इंदापूर तालुक्यात दशरथ माने यांचं कुटुंब राजकीयदृष्ट्या शक्तीशाली समजलं जातं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दशरथ माने यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रवीण माने यांनीही पत्रकार परिषद घेत आम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.

३. दौंड

दौंड तालुक्यात भाजपचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत, तर त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे हे दोन्हीही नेते सध्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. तसंच तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत अशा ठिकाणी निवडून गेलेले नेतेही महायुतीच्याच प्रचारात दिसत आहेत.

४. पुरंदर

पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत. ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय असले तरी माजी आमदार दादा जाधवराव, शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे अशी मातब्बर मंडळी महायुतीच्या बाजूने आहेत. 
  
५. भोर-वेल्हा-मुळशी

भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचं दिसत आहे. कारण या मतदारसंघातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच भोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन केलं होतं. मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी संग्राम थोपटे यांचे वडील आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. तसंच या परिसरातील राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारीही पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत गेले आहेत.

६. खडकवासला

या मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. तसंच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यादेखील याच खडकवासला भागातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही महायुतीच्या उमेदवाराला राजकीय ताकद मिळणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यातच पवार कुटुंबाचा गड मानला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने असल्याने ही निवडणूक दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे. अशा स्थितीत पक्षसंघटनेवर पकड असलेले अजित पवार बाजी मारणार की आपल्या लोकसंग्रहासाठी ओळखले जाणारे शरद पवार हे सरस ठरणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Sharad Pawar started using old tactics to campaign for Supriya Sule After local leaders going with Ajit Pawar in baramati lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.