पुण्यात गणेशोत्सवात मद्यविक्री बंद! संपूर्ण जिल्ह्यात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी १० दिवस "ड्राय डे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:25 IST2025-08-26T15:23:44+5:302025-08-26T15:25:14+5:30
कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे

पुण्यात गणेशोत्सवात मद्यविक्री बंद! संपूर्ण जिल्ह्यात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी १० दिवस "ड्राय डे"
पुणे : शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या मध्यवर्ती भागातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गणेश चतुर्थीपासून अर्थात २७ ऑगस्ट ते अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच ७ सप्टेंबर या काळात ११ दिवस संपूर्ण मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे, संपूर्ण जिल्ह्यात गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.
मध्यवर्ती भागात अनेक मानाचे आणि प्रमुख गणपती मंडळे आहेत. या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्तांची गर्दी होते. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी (दि. २७) श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे, तर ७ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. या दोन्ही दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी असेल. तसेच, ७ सप्टेंबर रोजी महापालिका हद्दीतील सर्व दारूची दुकाने बंद राहणार आहेत. ज्या भागात ५ व्या आणि ७ व्या दिवशी विसर्जन मिरवणुका काढल्या जातात, त्या दिवशी संबंधित भागातील मद्यविक्री बंद ठेवली जाईल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.