बारामतीचा नवा कारभारी कोण होणार ? अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:02 IST2025-11-10T14:01:57+5:302025-11-10T14:02:30+5:30
- अनेकांनी सुरू केली मतदारांची गाठीभेटी; जय पवार यांच्या नावाची चर्चाही रंगली

बारामतीचा नवा कारभारी कोण होणार ? अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
बारामती : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीची शहरात जोरदार रणधुमाळी सुरू आहे. यंदा बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी राखीव करण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार जे म्हणतील, त्याच उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या निर्णयाकडे इच्छुकांची नजर लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीचा नवा कारभारी कोण होणार, यावर सध्या शहरात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या कार्यालयात इच्छुकांनी शुक्रवारी (दि. ७) पासूनच चक्कर मारायला सुरुवात केली असून, नगराध्यक्ष पदासाठी मागणीसाठी अर्ज देखील भरायला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठीही इच्छुकांच्या गतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. बारामती नगर परिषदेची निवडणूक नऊ वर्षांच्या थांबण्यानंतर होणार आहे. परिणामी, नऊ वर्षे वाट पाहणाऱ्या इच्छुकांनी आता पूर्ण ताकदीनी तयारी सुरू केली असून, यंदा नगराध्यक्ष पद खुल्या असल्यामुळे त्यासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे बारामती नगर परिषदेवर निर्विवाद वर्चस्व आहे. विकासाच्या दृष्टीने बारामती नगर परिषदेला राज्यात चांगली ओळख आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती शहराला देशात ‘टॉप’ शहरांमध्ये आणण्याचा मानस असून, त्यासाठी प्रभावी विकास करायचा आहे. या शहराचा देशपातळीवर नाव निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी पुढे आणावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांचा बारामतीत सकाळी पहाटेच विकासकामांची पाहणी करणारा व विविध आवश्यक सूचना देणारा कार्यक्रम असतो. ते शहर अधिक सुसज्ज करण्यासाठी नवीन प्रकल्प आणत असतात. २०२९ पर्यंत राज्यात महायुतीचे सरकार राहणार असल्यामुळे विकसनशील बारामतीसाठी आणि शहरातील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आणखी काही प्रकल्पांवर काम करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीकरांशी चांगला संवाद साधणाऱ्या व झपाट्याने काम करणाऱ्या उमेदवारावर उपमुख्यमंत्री पवार यांची नजर आहे.
पाच वर्षांसाठी जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांची चर्चा जोरावर आहे. शिवाय सचिन सातव, किरण गुजर, शिवाजीराव कदम, जय पाटील, सुभाष सोमाणी, बबलू देशमुख, संजय संघवी यांच्या नावांची देखील बारामतीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, उमेदवारी मिळण्यापूर्वीच इच्छुकांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, शरद पवार गटाने बारामतीत बारामती विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या भाजपने बारामती नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीत सध्या तिरंगी लढतीचे चित्र तयार झाले आहे.
२८८ जणांनी घेतले अर्ज
बारामती नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव, जय पाटील, प्रदीप शिंदे, करण वाघोलीकर, शिवाजीराव कदम, अनिल कदम, विशाल जाधव, विक्रांत तांबे, श्याम इंगळे, अभिजित काळे, सुभाष सोमाणी यांनी अर्ज केले आहेत. तर नगरसेवक पदासाठी २८८ इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.