भाजप पदाधिकाऱ्यांची प्रवेश बंद मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव; मंत्री महोदयांनी ही केला आयुक्तांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 21:07 IST2025-11-14T21:06:59+5:302025-11-14T21:07:24+5:30

-  एक प्रमुख पदाधिकारी घेणार आयुक्तांची भेट

pune news pressure on officials to withdraw entry ban on BJP office bearers; Minister calls Commissioner | भाजप पदाधिकाऱ्यांची प्रवेश बंद मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव; मंत्री महोदयांनी ही केला आयुक्तांना फोन

भाजप पदाधिकाऱ्यांची प्रवेश बंद मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव; मंत्री महोदयांनी ही केला आयुक्तांना फोन

पुणे - महापालिकेतील महिला अधिकाऱ्यास जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिल्याप्रकरणी महापालिका भवन व महापालिकेच्या मिळकींमध्ये प्रवेशबंदी केलेल्या भाजप पदाधिकाऱ्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून प्रशासनावर दबाव आणला जात आहे. याबाबत एका मंत्र्यांने काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आहे. आता भाजपचा एक जबाबदार पदाधिकारी सोमवारी बंदी असलेल्या पदाधिकाऱ्याला घेवून आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याचा पाठलाग करणे, अवमानास्पद टिप्पणी करुन मानसिक त्रास देणे, याप्रकरणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जून महिन्यात भाजपच्या कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यासह सहा जणांना महापालिका भवन व महापालिकेच्या मिळकतींमध्ये प्रवेश बंदी केली आहे. तसेच या सर्वांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये पदाधिकाऱ्याचे कार्यकर्ते म्हणून त्याची पाठराखण करणाऱ्या महापालिकेच्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे. महापालिका आयुक्तांनी प्रवेश बंदी केलेल्यांपैकी काहीजण महापालिकेत वावरताना दिसतात. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.


दरम्यान, प्रवेश बंदीची कारवाई मागे घेण्यासाठी भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने दबाव आणल्यामुळे बंदीची कारवाई केलेल्या सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. आता महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अशा वेळी एखाद्या पदाधिकाऱ्यावर बंदी असणे, हे पक्षासाठी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांसाठी अडचणीचे ठरणारे आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यावरील प्रवेश बंदीची कारवाई मागे घ्यावी, यासाठी थेट महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांवर दबाव आणला जात आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका मंत्र्यांनी ही बंदी मागे घेण्यासाठी आयुक्तांना फोन केला होता. मंत्री महोदयांच्या फोननंतर आता भाजपचे एक जबाबदार पदाधिकारी सोमवारी बंदी असलेल्या पदाधिकाऱ्याला घेऊन आयुक्तांची भेट घेणार आहेत. या भेटीत माफीनामा देऊन बंदी मागे घेण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
 
असे होणार असेल तर मग आम्ही काम कसे करायचे....

कार्यालयात काम करताना आम्हाला कायमच राजकीय नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जातो. पहिली वेळ महापालिका आयक्तांनी धाडस करून कोणावर तरी प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. राजकीय नेते ही बंदी मागे घेण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याने बंदी उठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पदाधिकारी व त्याच्या कार्यकर्त्यांवरील बंदी उठवली तर मग आम्ही काम कसे करायचे, अशी प्रतिक्रीया काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: pune news pressure on officials to withdraw entry ban on BJP office bearers; Minister calls Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.