यवत-बोरीभडक जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणे बनली गुंतागुंतीची
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:51 IST2025-11-10T15:51:02+5:302025-11-10T15:51:11+5:30
यवत-बोरीभडक जिल्हा परिषद गटात उमेदवारीवर उत्सुकता

यवत-बोरीभडक जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणे बनली गुंतागुंतीची
- दादा चौधरी
भांडगाव : यवत-बोरीभडक जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले असून, उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या गटामध्ये यवत, भांडगाव, वाखारी, सहजपूर, बोरीभडक, बोरीऐंदी, ताम्हणवाडी, डाळिंब, कासुर्डी, भरतगाव आणि नांदूर या गावांचा समावेश आहे. यवत गटात यंदाही मुख्य लढत भाजपचे राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे रमेश थोरात अशी होण्याची चिन्हे आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुद्धा निर्णायक ठरणार असून, कोणत्या गटाला किती पाठबळ मिळते, यावर अंतिम चित्र ठरेल.
या गटात परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत राहिला असला तरी गेल्या काही काळात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे समीकरणे बदललेली दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झाले आहेत. यवत-बोरीभडक गटासाठी यंदा मागास प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे सर्व गटांसमोर मोठे राजकीय गणित उभे राहिले आहे. कुणबी मागासवर्गीयांना तिकीट द्यायचे की इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराला हे दोन्ही पक्षांच्या धोरणावर अवलंबून आहे.
गटातील जात-गणिताचा विचार करता, सुयोग्य उमेदवार न दिल्यास पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार गटातर्फे इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या आहेत, यामध्ये मंगेश रायकर यवत, अमित कुदळे यवत, दत्तात्रय थोरात सहजपूर, सारिका भुजबळ यवत, तात्यासाहेब ताम्हाणे भरतगाव, बापूसाहेब मेहेर सहजपूर, अमोल म्हेत्रे बोरीभडक, विजय म्हेत्रे सहजपूर, पोपट बोराटे नांदूर, दौलत ठोंबरे कासुर्डी, जीवन म्हेत्रे सहजपूर यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून अद्याप मुलाखती झालेल्या नसल्या तरी अविनाश कुदळे, संदीप ताम्हाणे, युवराज बोराटे, बाळासाहेब गायकवाड, संदीप गायकवाड, मोहन म्हेत्रे यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवारी कोणाला मिळते, यावरच या गटातील अंतिम राजकीय समीकरणे ठरणार आहेत.