Pune Municipal Election Results 2026:‘माणुसकीची गाडी’ ठरली चर्चेचा विषय! राघवेंद्र (बाप्पु) मानकर पहिल्या फेरीअखेर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:30 IST2026-01-16T12:29:37+5:302026-01-16T12:30:03+5:30
पुण्यातील प्रभाग २५ मधील भाजप उमेदवार राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांनी पहिल्याच फेरीत ८ हजार मतांची आघाडी घेत लक्ष वेधून घेतले आहे.

Pune Municipal Election Results 2026:‘माणुसकीची गाडी’ ठरली चर्चेचा विषय! राघवेंद्र (बाप्पु) मानकर पहिल्या फेरीअखेर आघाडीवर
पुणे :पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपने शहरात जोरदार मुसंडी मारली असून, एकूण ४७ जागांवर भाजप आघाडीवर, तर राष्ट्रवादी १२ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप ३८ जागांवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रभाग २५ मधील भाजप उमेदवार राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांनी पहिल्याच फेरीत ८ हजार मतांची आघाडी घेत लक्ष वेधून घेतले आहे.
निवडणूक काळात उमेदवारांच्या आलिशान गाड्या, महागड्या एसयूव्ही आणि लक्झरी वाहनांची जोरदार चर्चा होत असते. मात्र, या झगमगाटापासून वेगळा ठसा उमटवणारा उमेदवार म्हणजे राघवेंद्र बाप्पु मानकर. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर ना आलिशान कार, ना महागडी दुचाकी, तर केवळ एक रुग्णवाहिका असल्याची नोंद आहे.
ही रुग्णवाहिका त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयामार्फत गरजू नागरिकांच्या सेवेत कार्यरत असते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी ही रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे “आलिशान गाड्यांचा नाही, तर माणुसकीचा वारसा” जपणारा उमेदवार म्हणून बाप्पु मानकरांची ओळख निर्माण झाली आहे.
राघवेंद्र मानकर हे भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरातून निवडणूक लढवत असून, मिळालेली आघाडी पाहता त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजकीय ताकदीसोबतच सामाजिक जाणिवेचा मुद्दा मतदारांना भावल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.