पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:43 IST2025-08-06T12:41:48+5:302025-08-06T12:43:05+5:30
पोलिसांसाठी कोणतेही मंडळ महत्त्वाचे व कोणतेही मंडळ कमी महत्त्वाचे नाही, आमच्यासाठी सर्व मंडळ सारखीच आहेत

पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही
पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या लांबणाऱ्या वेळेवरून निर्माण झालेल्या तिढ्यावर पोलीस आयुक्त कार्यालयातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत तोडगा निघू शकलेला नाही. शहरातील सर्व गणेश मंडळांची एकत्रित बैठक घेऊन समन्वयाने हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. याला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली असून, दोन दिवसांत संयुक्त बैठक घेऊन याबाबत चित्र स्पष्ट करू, असे आश्वासन दिले आहे.
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाकडून दरवर्षी बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये गणेश मंडळांमध्ये दोन गट पाहायला मिळतात. शहरातील मानाच्या पाच गणेश मंडळांसह इतर तीन मंडळांना प्रशासनाकडून झुकते माप दिले जाते. या मंडळांमुळे आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला वेळ मिळत नाही, असा आरोप शहरातील विशेषतः पूर्व भागातील मंडळांकडून केला जातो. त्यातच यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई गणेश मंडळाने मानाच्या पाच गणपतींनंतर आम्ही मिरवणूक काढणार, असे जाहीर केल्याने विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या नंबरवरून तिढा निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयात मंगळवारी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ११ च्या सुमारास शहरातील इतर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, संजय बालगुडे, श्रीकांत भिसे, पुष्कर तुळजापूरकर, सुनील कुंजीर, विशाल गुंड, आनंद सगरे आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी एक वाजता पोलीस आयुक्तांनी मानाच्या पाच मंडळांसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई, बाबू गेनू, जिलब्या मारुती या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
पहिल्या बैठकीमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपले अक्षेप नोंदवले. मानाच्या व त्यानंतरच्या पाच मंडळांना आणि इतर मंडळांना पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळा न्याय दिला जातो. त्यांच्यासाठी आमच्यावर अन्याय केला जातो. वेळेत मिरवणूक संपवण्यासाठी पोलिसांनी मिरवणुकीमध्ये ‘एक मंडळ, एक ढोल पथक’ हा नियम लागू करावा. मानाच्या मंडळांसाठी पोलिसांनी केळकर, कुमठेकर व टिळक रस्त्यावरील मंडळांना आडवू नये, सकाळी सात वाजता मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी, लक्ष्मी रस्त्यावर आणखी मंडळांना परवानगी देऊ नये, गणेशोत्सवामध्ये बेलबाग चौक ते नाना पेठ हा रस्ता बंद न करता सुरू ठेवावा, अशा मागण्या केल्या.
पोलिस प्रशासनाने इतर मंडळांचे अक्षेप व मागण्या मानाच्या पाच व पाच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडल्या. यावर बैठकीत चर्चा झाली. तुम्ही शहरातील मानाची व महत्वाची मंडळे असल्याने इतरांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची तुमची जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांची एकत्रित बैठक घेऊन समन्वयाने मार्ग काढावा, आणि तुमचा सर्व मंडळांचा निर्णय पोलीस प्रशासनास कळवावा, त्यानुसार आपण कार्यवाही करू, असे पोलीस अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यावर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसात सर्व मंडळांची संयुक्त बैठक बोलावून समन्वयाने मार्ग काढण्याचे मान्य केले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई निर्णयावर ठाम
श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळ व आमच्या मध्ये कसलेही वाद किंवा मतभेद नाहीत. दगडूशेठ गणपतीची मिरवणूक सायंकाळी ४ वाजता निघणार आहे. त्यापूर्वी मानाच्या गणेश मंडळांची मिरवणूक ढोल पथकांची संख्या कमी होणार असल्याने दुपारी २ वाजेच्या सुमारास बेलबाग चौकातून मार्गस्थ होईल, त्यामुळे मानाच्या पाचव्या मंडळाच्या मिरवणुकीनंतर लगेच आम्ही मिरवणूक सुरू करू, आमच्या मिरवणुकीचा ४ वाजता निघणाऱ्या दगडूशेठच्या मिरवणुकीला अडथळा होणार नाही, असे म्हणत भाऊसाहेब रंगारीचे पुनीत बालन व अखिल मंडईचे अण्णा थोरात यांनी घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे नमूद केले.
गणेश मंडळांसह झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मिरवणुकीतील नंबरसंदर्भात पोलिस प्रशासन स्वतःहून कोणताही निर्णय घेणार नाही. जी परंपरा, प्रथा आहे, ती अबाधित राहण्यासाठी सर्व गणेशभक्त व सर्व घटकांच्या हिताचा निर्णय व्हावा, एवढाच आमचा प्रयत्न आहे. पोलिसांसाठी कोणतेही मंडळ महत्त्वाचे व कोणतेही मंडळ कमी महत्त्वाचे नाही, आमच्यासाठी सर्व मंडळ सारखीच आहेत. त्यामुळे सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून आपापसात चर्चा करून निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन दिवसात मंडळाची बैठक होणार आहे, त्यानंतर पुन्हा आम्ही सर्वांची एकत्रित बैठक घेऊ. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे