भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा; त्यांनाच जवळ घेऊन स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार, शरद पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 09:29 IST2024-04-17T09:28:33+5:302024-04-17T09:29:11+5:30
२०१४ मध्ये इंधन दरवाढ रोखण्याचे, २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे, घरगुती गॅसची किंमत कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही

भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा; त्यांनाच जवळ घेऊन स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार, शरद पवारांची टीका
इंदापूर : भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा करुन, त्यांनाच जवळ घेत, स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झाले असल्याची टीका शरद पवार यांनी मंगळवारी ( दि. १६) केली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, भाजपचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद ,तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रतापराव पालवे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्या निमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.वाघ पॅलेस येथे अभूतपूर्व गर्दीत हा कार्यक्रम पार पडला.
शरद पवार म्हणाले की, २०१४ मध्ये इंधन दरवाढ रोखण्याचे, २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे, घरगुती गॅसची किंमत कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही. शंभरातल्या बेकार तरुणांपैकी ८७ तरुणांना आज देखील नोकरी नाही. काळा पैसा संपवून गरिबांच्या खिशात १५ लाख रुपये जमा करणार असे त्यांनी सांगितले. १५ लाख सोडा, १५ रुपयेसुद्धा गरीबांच्या खिशात पडलेले नाही. २०१६ मध्ये नोटाबंदी केली. शंभर, पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्या. पण काळा पैसा संपला नाही. एका बाजूला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशात टाकायचे, दुसऱ्या बाजूला खतांचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे, विजेचे दर वाढवायचे, दुसऱ्या बाजूला ती रक्कम काढून घ्यायची, असा प्रकार होत असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
आता पुन्हा मोदी यांच्या हातात देशाची सत्ता द्यायची नाही, हे लोकांच्या लक्षात आलं आहे. ज्या कुटुंबांनी स्वातंत्र्याआधी व नंतर देशाची सेवा केली केली त्या कुटुंबांकडे देशाची सत्ता द्यायची की, देशातल्या माणसांमध्ये, जातींमध्ये, धर्मांमध्ये, भाषांमध्ये एक प्रकारचा दुरावा व अंतर वाढवण्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला. त्यांच्या हातात सत्ता द्यायची, हा निकाल यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घ्यायचा आहे, असे पवार म्हणाले.
आतापर्यंत मारामारी, मतभेद नको यासाठी आम्ही लक्ष देत नव्हतो. मात्र आता बारामती असेल, महाराष्ट्राची अनेक मोठी गाव असतील तिथे अनेक कार्यक्रम,धोरणे राबवली.संस्था उभ्या केल्या.हाच दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा आहे, असे पवार म्हणाले.