दौंडमध्ये कुसेगाव परिसरात असणाऱ्या जंगलात प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 17:54 IST2021-05-23T17:53:55+5:302021-05-23T17:54:02+5:30
विवाहास घरच्यांचा विरोध असल्याने उचलले टोकाचे पाऊल

दौंडमध्ये कुसेगाव परिसरात असणाऱ्या जंगलात प्रेमीयुगुलाची आत्महत्या
पाटस: कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत सर्वत्र नैराश्याचे वातावरण दिसून येत आहे. भीतीमुळे नागरिकांच्या मानसिक ताणतणावात वाढ होत आहे. अशाच परिस्थितीत दौंड तालुक्यातील कुसेगाव परिसरातील जंगलात प्रेमीयुगुलानी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या विवाहास घरच्यांच्या विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
किरण क्षिरसागर (वय २५, रा. दौंड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मुलगी अल्पवयीन असून पाटस (ता. दौंड) येथील रहीवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसेगाव परिसरातील जंगलात युवक आणि युवती किटकनाशक पिऊन पडलेले असल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक संजय नागरगोजे, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण हे घटनास्थळी गेले.
त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही उपचारासाठी दौंड येथील ऊपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दोघेही नात्यातील असून त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे पाऊल उचललेल असल्याचे पोलिसांनी सांगितले.