निवडणुकीत वारेमाप पैशांचा वापर होण्याची शक्यता; खर्चावर इन्कम टॅक्स विभागाचा वॉच, नागरिकांनाही तक्रार करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:52 IST2025-12-24T16:51:03+5:302025-12-24T16:52:19+5:30
निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होताना दिसल्यास ही माहिती इन्कम टॅक्स विभागाला कळवण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.

निवडणुकीत वारेमाप पैशांचा वापर होण्याची शक्यता; खर्चावर इन्कम टॅक्स विभागाचा वॉच, नागरिकांनाही तक्रार करता येणार
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांकडून वारेमाप पैशांचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या वापरावर इन्कमटॅक्स विभागाचा वॉच असणार आहे. वारेमाप खर्चाला आळा घालण्यासाठी निवडणूक काळात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनाही अशा प्रकारांविरोधात थेट तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाली आहे. पालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात काही उमेदवार पैशांचा वापर करतात. निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या वापरावर इन्कमटॅक्स विभाग वॉच ठेवणार आहे. वारेमाप खर्चावर आळा घालण्यासाठी निवडणूक काळात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, अहिल्यानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, तसेच सांगली-मिरज-कुपवाड या महापालिका क्षेत्रांचा समावेश आहे. आचारसंहिता लागू राहील, तोपर्यंत ही यंत्रणा सक्रिय राहणार आहे.
येथे करा तक्रार
महापालिका निवडणूक काळात येणाऱ्या तक्रारींवर त्वरित दखल घेण्यात येणार असून, संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होताना दिसल्यास ही माहिती इन्कम टॅक्स विभागाला कळवण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. टोल फ्री क्रमांक : १८००-२३३-०७०१ व्हॉट्सॲप क्रमांक : ९९२२३८०८०६ ईमेल आयडी : pune.pdit.inv@incometax.gov.in या वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.