PMC Elections : उद्धवसेना, मनसे आघाडीत लढणार की, स्वतंत्र; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:01 IST2025-12-26T09:58:24+5:302025-12-26T10:01:05+5:30
- मुंबईप्रमाणेच पुण्यातही युती झाली भाजपच्या मनसुब्यावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे.

PMC Elections : उद्धवसेना, मनसे आघाडीत लढणार की, स्वतंत्र; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
पुणे : राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्धवसेना आणि मनसे यांची युती जाहीर झाली आहे; परंतु महाविकास आघाडीची घोषणा अद्याप झालेली नाही. शिवाय इतर पुणे शहरातही उद्धवसेना आणि मनसे युतीचा निर्णय झालेला नाही. यामुळे राज्यातील इतर महापालिकांत अजूनही युतीची चर्चा तळ्यातमळ्यातच आहे. यामुळे उद्धवसेना व मनसे हे आघाडीत की, स्वतंत्र लढणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीची वारे जोरात वाहत आहेत. यामध्ये भाजपने सर्वच पक्षांतील प्रमुख नेते, माजी नगरसेवक फोडून स्वत:ची ताकद वाढवली आहे. पुण्यातही शिवसेना, मनसेची अवस्था बिकट आहे. बुधवारी मुंबईत शिवसेना आणि मनसेची युती झाल्याने शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे उद्धवसेना आणि मनसेची साहजिकच ताकद वाढली आहे.
मुंबईप्रमाणेच पुण्यातही युती झाली भाजपच्या मनसुब्यावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. उद्धवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव, माजी गटनेता पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. यामुळे शहरातील उद्धवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आघाडीची घोषणा लवकरच करून तयारी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यादृष्टीने कोणत्याही हालचाल होताना दिसत नाहीत. शिवाय यास वेळ लागल्यास ताकद वाढूनही इच्छित परिणाम साधणे कठीण होईल.