PMC Elections : पुण्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; काँग्रेसचे दोन नेते भाजपच्या गळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:02 IST2025-12-25T10:01:11+5:302025-12-25T10:02:30+5:30
महापालिकेच्या निवडणुकीसाठी चारसदस्यीय प्रभाग पद्धती अवलंबण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रभागात विजय मिळवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय राहणार नाही

PMC Elections : पुण्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; काँग्रेसचे दोन नेते भाजपच्या गळाला
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ही मुदत जसजशी संपत येत आहे, तसतशी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ठाकरे गटाच्या दोन नेत्यांचा प्रवेश झाल्यानंतर आता काँग्रेसचे दोन नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. या दोन नेत्यांचा पक्षप्रवेश आज, २५ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी चारसदस्यीय प्रभाग पद्धती अवलंबण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रभागात विजय मिळवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे इतर पक्षांतील इच्छुक आणि नेत्यांचा ओढा भाजपमध्ये प्रवेश करण्याकडे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दुभंगल्याने आणि काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी या तीन पक्षांतील नेत्यांची संख्या जास्त आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी व इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी ठाकरे सेनेच्या माजी गटनेत्यांनी पुण्यातील भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपच्या गळात काँग्रेसचे दोन नेते लागले आहे. या दोन नेत्यांमध्ये एक माजी राज्यमंत्री असून ते आपल्या मुलासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत; तर दुसरे एक नेते शिवाजीनगर परिसरातील असून त्यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवरून विरोध होतानाही वरिष्ठांनी हिरवा सिग्नल दिला आहे. या दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश आज, गुरुवारी मुंबईत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.