PMC Elections 2026 : ‘त्रिकुटा’ कारभाऱ्यांमुळे शहराच्या विकासाची गती मंदावली; अजित पवारांचा भाजपवर थेट हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:01 IST2026-01-04T12:00:50+5:302026-01-04T12:01:36+5:30
शहराचा विकास करायचा असेल, तर ‘त्रिकुट’ कारभारी बदला आणि माझ्या हाती सत्ता द्या, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला

PMC Elections 2026 : ‘त्रिकुटा’ कारभाऱ्यांमुळे शहराच्या विकासाची गती मंदावली; अजित पवारांचा भाजपवर थेट हल्ला
पुणे : महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीनंतर सत्ताधारी राहिलेल्या पक्षांकडून गेली ९ वर्षे महापालिकेचा कारभार केला जात आहे. कारभारी त्रिकुटाच्या ठेकेदारांवरील प्रेमाने शहराच्या विकासाची गती मंदावली आहे. शहराचा विकास करायचा असेल, तर ‘त्रिकुट’ कारभारी बदला आणि माझ्या हाती सत्ता द्या, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, ‘जय जिनेंद्र’ म्हणत जैन बोर्डींग जमीन विक्रीतील गैरव्यवहाराची आठवण करून देत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाव न घेता प्रहार केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पदाधिकारी, आरपीआय खरात गट, तसेच अन्य मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात केवळ तिघांचा कारभार चालायचा. हे ‘त्रिकुट’ शहरातील समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहतूककोंडीत अडकले आहे. रस्त्यांच्या कामासाठी पाच वर्षांत एक हजार कोटींहून अधिकची तरतूद करण्यात आली. परंतु, यापैकी केवळ ६० टक्केच रक्कम खर्च झाली. रस्त्यांच्या कामात रिंग करणे, ठराविक ठेकेदारांनाच काम मिळावे एवढाच एककल्ली कार्यक्रम राहिला. त्यामुळे पुणेकरांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागला. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने मी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे २५० कि.मी.चे रस्ते दर्जेदार करून घेतले आहेत.
आजही सुमारे एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. सफाईचे काम १२ हजार कर्मचारी करतात. यानंतरही सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. आजही मैलापाण्यावर पूर्णत: प्रक्रिया होत नाही. एसटीपींचे प्रकल्प रखडले आहेत. यामुळे नदीचे पाणी दूषित आहे. हवेचे प्रदूषण वाढले आहे. याला कारणीभूत सत्ताधाऱ्यांची शहराबद्दलची अनास्था आहे. महापालिकेत ३२ गावांचा समावेश केला. परंतु, या गावांतील कामांसाठी तरतूद केलेल्या रकमेतील जेमतेम २० टक्के निधी वापरला गेला आहे. येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यांच्यावर जिझिया कर लावला आहे. अंदाजपत्रकात भूसंपादनासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करूनही रस्त्यांसाठी भूसंपादन होत नाही.
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम दहा वर्षांनंतरही अपुरे आहे. शहरात ९०० एमएलडी मैलापाणी निर्माण होत असताना केवळ ५०० एमएलडीचे प्रक्रिया प्रकल्प आहेत. एसटीपी प्रकल्पांच्या कामातही केवळ ठेकेदार नेमण्याचे काम झाले. मात्र, काम करून घेण्याबद्दलची अनास्था दिसत आहे. पाच वर्षांत ११३० कोटींची तरतूद असताना केवळ ८५८ कोटींची कामे झाली, हे प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. महापालिकेत कारभाऱ्यांचे त्रिकुट असून, ते बदलायला हवे. यासाठी महापालिकेत आम्हाला सत्ता द्या, पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसारखे करून दाखवतो, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.
घायवळ परदेशात कसा पळून गेला, ‘जय जिनेंद्र’
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्ला चढवताना अजित पवार म्हणाले, कोथरूडमधील घायवळ हा गुन्हेगार परदेशात कसा पळून गेला, हे त्यांनी सांगावे. तसेच, जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डींगच्या जागेच्या गैरव्यवहारावरून मोहोळ यांचा नामोल्लेख टाळत चिमटा काढला. एखाद्याच्या पतीने गुन्हा केला म्हणून त्याची पत्नी व कुटुंबीयांना गुन्हेगार ठरविणे योग्य नाही. बापू नायर या गुन्हेगाराच्या उमेदवारीवरून मोहोळ यांनी नायर याची उमेदवारी मित्र पक्षाने दिल्याचे सांगत त्यावर अधिक भाष्य टाळले.