PMC Elections अन्यायाविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी; मला उमेदवारी द्यावी; संजीवनी कोमकरांची अजित पवारांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:16 IST2025-12-28T13:15:02+5:302025-12-28T13:16:32+5:30
आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आंदेकर कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.

PMC Elections अन्यायाविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी; मला उमेदवारी द्यावी; संजीवनी कोमकरांची अजित पवारांकडे मागणी
पुणे - शहरातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या बंडू आंदेकरने यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. “नेकी का काम आंदेकर का नाम”, “बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय”, “आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत” अशा घोषणा त्याने दिल्या. बंडू आंदेकर मोठमोठ्या आवाजात घोषणाबाजी करीत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करायला गेला खरा; मात्र अर्ज अर्धवट असल्यामुळे तो भरूनच घेतला नाही अशीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या घडामोडींवर आज आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आंदेकर कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, पोलिसांनी आणि न्यायालयाने आंदेकरला अर्ज भरण्याची परवानगी दिली असली तरी अर्ज भरण्यापूर्वी करण्यात आलेली घोषणाबाजी चुकीची होती. या प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदेकर आरोपींनी अनेक लोकांची घरे उध्वस्त केली आहेत. त्यांनी समाजासाठी काय काम केले आहे? माझे लोकांना आवाहन आहे की त्यांनी आंदेकरांना मतदान करू नये, त्यांना निवडून देऊ नये आणि कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये असे आवाहन संजीवनी कोमकर यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, अन्यायाविरोधात लढण्यासाठी मी स्वतः निवडणूक लढवण्यास तयार असून त्यासाठी उमेदवारी देण्यात यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून त्या म्हणाल्या, अजित पवार कोयता गँग थांबवा असे म्हणतात, मग आंदेकरांना तिकीट देऊ नये. आंदेकरांना कोण मदत करत आहे याची माहिती नसली तरी राजकीय लोक त्यांना मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जर कोणत्याही पक्षाने आंदेकरांना तिकीट दिले, तर त्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणूक लढवण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे सांगत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. संजीवनी कोमकर यांनी पुढे स्पष्ट केले की, वनराज आंदेकर हा त्यांचा भाऊ असला तरी वनराज आंदेकर हत्या प्रकरणाशी त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. मी माझ्या भावाची सुपारी का देईन? आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, तरीही आम्हाला भोगावे लागत आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी आंदेकर कुटुंबावर गंभीर आरोप करत विजय निंबाळकर, निखिल आखाडे, आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्यांचा उल्लेख केला. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, आंदेकर कुटुंबाच्या उमेदवारीवरून पुढील काळात वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.