PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादी अन् काँग्रेसची बैठक; जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:41 IST2025-12-25T09:40:37+5:302025-12-25T09:41:30+5:30
येत्या एक ते दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादी अन् काँग्रेसची बैठक; जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट यांच्याबरोबर काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत बैठक झाली. त्यामध्ये काही जागांवर निर्णय झाला. पण काही जागांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसचे जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. येत्या एक ते दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र शहर पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. तिन्ही पक्षांची बैठक आज झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे, आमदार बापू पठारे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के, अजित पवार गटाच्या वतीने शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, तर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड उपस्थित होते. महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शहर पातळीवरील नेत्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीमध्ये संभाव्य आघाडीबाबत आणि जागा वाटपाबाबत चर्चा झाली. त्यामध्ये काही जागांवर निर्णय झाला. पण काही जागांवर तोडगा निघाला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
उध्दवसेना गटाबरोबर चर्चा सुरू
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याबरोबर काँग्रेस यांच्यात जागा वाटपाबाबत बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उध्दवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांच्याबरोबरही चर्चा केली.
उमेदवारी यादी तयार
पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी यादी तयार आहे. काँग्रेसनेही उमेदवारी यादी तयार केली आहे. ही यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहे.