PMC Elections 2026: काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीसोबत गेल्यास पुण्यात वेगळे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:05 IST2025-12-24T16:04:58+5:302025-12-24T16:05:30+5:30
Pune Municipal Election 2026: दोन वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रित सत्ता महापालिकेत आली ती २०१७ पर्यंत कायम होती.

PMC Elections 2026: काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीसोबत गेल्यास पुण्यात वेगळे चित्र
पुणे - पुण्यामध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येत असल्यामुळे महाविकास आघाडीबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर एका बाजूला भाजपच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याचा विचार सुरू आहे, असे झाल्यास पुण्यामध्ये अटीतटीच्या लढती पहावयास मिळतील.
काँग्रेसने सुरुवातीला स्वबळावर लढण्याचा विचार केला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये दोन बैठका झाल्या. त्यामध्ये जागावाटपाची सूत्रे ठरत असतानाच गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रस्ताव सध्या फारसा पुढे सरकलेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पुण्यात २००७ पासून काँग्रेसची पीछेहाट सुरू
तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यातील वादामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांची युती आकाराला आली. त्याला पुणे पॅटर्न असे नाव देण्यात आले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी पुण्यात सत्तेवर आले. त्यानंतर दोन वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रित सत्ता महापालिकेत आली ती २०१७ पर्यंत कायम होती.
२०१७ मध्ये भाजपने चार नगरसेवकांचा एक प्रभाग केल्यामुळे सर्वच विरोधी पक्षांचे हाल झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपात वाद झाल्याने काही प्रभागात ते आघाडी करून लढले तर काही प्रभागांत ते परस्परांविरुद्ध उभे राहिले. त्यामुळे दोन्ही पक्षांना भाजप पुढे पराभव पत्करावा लागला. केवळ काँग्रेसचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले. त्यांच्यासोबत रवींद्र धगेकर अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. अशा रीतीने काँग्रेसचे १० नगरसेवक झाले. त्यांच्याबरोबर एक स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर हे होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या एका नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अविनाश साळवे यांनी प्रवेश केला.
काँग्रेसचे केवळ पाच प्रभागांमध्ये १० नगरसेवक निवडून आले होते. त्यांच्यापैकी चौघा जणांनी आता काँग्रेस सोडली आहे. त्यामुळे काँग्रेसकडे २०१७ मध्ये निवडून आलेले केवळ सहा नगरसेवक आहेत. त्यापैकी चौघे जण पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील आहे. दोघे जण कोथरूड मतदारसंघातील आहेत. हे सर्वजण तीन प्रभागांतील नगरसेवक आहेत, अशी काँग्रेसची दारुण स्थिती झाली आहे. मात्र काँग्रेसची स्वतःची मते पक्की आहेत. त्याचा फायदा त्यांना होतो. मुस्लिम आणि दलित समाजामध्ये काँग्रेसला मतदान होते.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पुणे रेल्वे स्थानकालगत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह तिघे जण निवडून आले होते. त्या प्रभागाला येरवडा आणि कसबा पेठ मोमीनपुरा यांचा भाग जोडला आहे. तो भाग काँग्रेसच्या दृष्टीने आता चांगला झाला आहे. त्यालगतचा कासेवाडीच्या प्रभागात अविनाश बागवे हे सर्वसाधारण गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. बागवे यांच्या प्रभागातील अनुसूचित जातीसाठीची जागा ही महिलांसाठी आरक्षित झाली आहे. या ठिकाणी काँग्रेस स्वतंत्र पॅनल उभारण्याची शक्यता आहे. येथून पूर्वी रफिक शेख हेही त्यांच्यासोबत निवडून आले होते.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस अजूनही भाजपला चांगली टक्कर देऊ शकेल, अशी स्थिती आहे. लगतच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातही काही प्रभागांत अशी स्थिती आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी काँग्रेस या निवडणुकीत अतिशय ताकतीने लढू शकेल, अशी सध्याची स्थिती आहे.
काँग्रेसने सर्व प्रभागात पक्ष बांधणी केली तसेच त्यांच्याकडे सुमारे १८२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. काँग्रेसचे काही कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने लढू शकतील, अशी स्थिती आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे पॅनल हे सक्षम कोठे होते, आहे त्याकडे लक्ष द्यावे लागेल. राष्ट्रवादी अजित पवार आणि काँग्रेस यांची जर आघाडी झाली तर काँग्रेसच्या वाट्याला काही चांगल्या जागा येतील त्याचा त्यांना फायदा होईल.