PMC Elections 2026: स्थानिक प्रश्नावर टीका करा, केंद्र-राज्यसरकारवर नको;अजित पवार यांचा उमेदवारांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:11 IST2026-01-06T19:09:18+5:302026-01-06T19:11:37+5:30
पुणे महापालिकेच्या निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे जात आहे. त्यामुळे या उमदेवाराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली.

PMC Elections 2026: स्थानिक प्रश्नावर टीका करा, केंद्र-राज्यसरकारवर नको;अजित पवार यांचा उमेदवारांना सल्ला
पुणे : महापालिकेची निवडणूक स्थानिक प्रश्नांच्या आधारे लढली जाते. त्यामुळे निवडणुकीत प्रचार करताना स्थानिक प्रश्नावर भर देऊन टीका करा. राज्य आणि केंद्रसरकारच्या प्रश्नांवर टीका करू नये. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना मनात आकस न ठेवता पॅनेलमधील चारही उमेदवारांशी समन्वय ठेवा. सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर करावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारांना दिला.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे जात आहे. त्यामुळे या उमदेवाराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, माजी शहराध्यक्ष दीपक मानकर, शहराध्यक्ष सुनिल टिंगरे, सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रभारी अध्यक्ष श्रीकांत पाटील, पालिका निवडणूक समन्वयक विशाल तांबे, मनाली भिलारे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पुणे महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. उमेदवारांनी खर्चाची मर्यादा पाळावी. खर्चाचा निटपणे हिशोब ठेवावा. पक्षाच्या उमेदवारांनी शांतपणे प्रचार करावा. या कालावधीत उमेदवारांनी अधिकाधिक लोकांमध्ये जावे. जनसंपर्क वाढवावा. पक्षाची शहरासाठी ध्येय धोरणे लाेकांना समजून सांगावी. उमेदवारांनी सकाळी लवकर उठून प्रचाराला लागावे. सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर करावा, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.
पॅनेलमधील चारही उमेदवाराशी समन्वय ठेवावा
राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना मनात आकस न ठेवता पॅनेलमधील चारही उमेदवाराशी समन्वय ठेवावा. एकदिलाने प्रचार करा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.