PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:13 IST2025-12-30T11:11:21+5:302025-12-30T11:13:05+5:30
Pune PMC Elections 2026: भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे.

PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. भाजपकडून "सन्मानपूर्वक" जागा न मिळाल्यामुळे शिंदेसेना नाराज आहे. भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे. भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली. या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात जागावाटपावरून गेले अनेक दिवस सुरू असलेला तिढा सुटण्याऐवजी आता थेट युतीच तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिवसेना आता स्वबळावर निवडणूक लढवणार असून, तब्बल १६५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
पुण्यात आता शिवसेना-भाजप लढणार नाही. या बैठकीतून रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे बाहेर पडले आहेत. सर्व कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देऊन अर्ज भरले जाणार असल्याचे भानगिरे यांनी सांगितले आहे. पुण्याच्या सर्व १६५ जाग लढणार असून १६५ जणांना एबी फॉर्म देणार आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती म्हणून लढणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शिंदे गटाला जागा कमी दिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर हे अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते. अजित पवारांनीही त्यांना युतीसाठी ग्रीन सिग्नल दिला नाही. अखेर शिंदेसेना पुण्यात स्वबळावर लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.
पुण्यातील एका खाजगी हॉटेलमध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि रवींद्र धंगेकर देखील उपस्थित असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. थोड्याच वेळात राज्याचे मंत्री उदय सामंत देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.