PMC Elections 2026: पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच आमचा मुख्य विरोधक;नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:27 IST2026-01-07T09:26:45+5:302026-01-07T09:27:54+5:30
निवडणुकीचा प्रचार करताना इतर पक्षांवर आरोप प्रत्यारोप न करता विकासाच्या मुद्द्यावर भर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

PMC Elections 2026: पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच आमचा मुख्य विरोधक;नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टच सांगितलं
पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता यात शिंदे सेनेच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे. शिंदे सेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप हा आमचा मुख्य विरोधक असल्याचे नमूद केले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप आमचा प्रमुख विरोधक आहे. मात्र, निवडणुकीचा प्रचार करताना इतर पक्षांवर आरोप प्रत्यारोप न करता विकासाच्या मुद्द्यावर भर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेत १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस सत्तेत होती, त्यानंतर भाजप सत्तेत आली. शहरात काही सेवा दिल्या गेल्या, मात्र अजूनही अनेक सुविधा देता आल्या असत्या. पाणी पुरवठ्याबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन नाही. पुणेकरांकडे केवळ रसद पुरवणारा कोटा म्हणून पाहिले गेले, असा आरोपही त्यांनी केला.
शहरातील विकासकामे आणि पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही ‘शब्द शिवसेनेचा’ या आशयाखाली पुणेकरांसमोर १८ मुद्द्यांचा विकासनामा सादर करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणेकरांना दिलेला शब्द शिवसेना पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांची ९ जानेवारीला सभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा येत्या ९ जानेवारीला पुण्यात होणार आहेत. संत कबीर चौक, कात्रज या भागात या सभा घेण्याचे नियोजन आहे. या सभेला जाताना उपमुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो देखील होणार असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. शिंदे यांच्यासह आमदार शहाजी बापू पाटील, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, योगेश कदम, नीलेश राणे असे प्रमुख नेते सभा घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.