PMC Elections 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:40 IST2026-01-15T08:35:17+5:302026-01-15T08:40:02+5:30
- ३ हजार ४३९ प्रतिबंधात्मक कारवाया; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

PMC Elections 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पुणे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून व्यापक बंदोबस्त आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन राबविण्यात आले आहे. शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच १२,५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ३ हजार २५० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या चार तुकड्या बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत. शहरातील ८८ सेक्टर निश्चित करून संवेदनशील भागात विशेष दक्षता घेतली जात आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान १८ स्थिर, १५ फिरते व १५ व्हिडीओ सर्वेक्षण पथकांद्वारे सतत नजर ठेवण्यात येत असून या कारवाईत आतापर्यंत ६७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विविध प्रतिबंधात्मक कायद्यांखाली एकूण ३ हजार ४३९ कारवाया करण्यात आल्या आहेत.
दारूबंदी कायद्यान्वये १७९ गुन्हे दाखल करून १ कोटी २३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थविरोधी मोहिमेत एमडी, गांजा, चरस व नशेच्या गोळ्यांसह सुमारे २६ लाख ८४ हजार ७२९ रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. निवडणूक काळात १५ अग्निशस्त्रे, १५ काडतुसे व २९ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून ३ हजार २९४ परवाना धारकांची शस्त्रे तात्पुरती जमा करून घेण्यात आली आहेत. याशिवाय शहरात ३१३ अजामीनपात्र वॉरंट्स बजावण्यात आले आहेत.
मतदान स्लिप वाटप, चांदीच्या वस्तूंचे वाटप आणि पैशांचे वाटप या संदर्भातील १७ गुन्हे दाखल करून २ लाख ६ हजार ३५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत हिंसाचाराचा एकही प्रकार घडला नसल्याचे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.