PMC Election 2026: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पुणे पोलिसांची कडक नजर; आतापर्यंत साडेपाच हजारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:22 IST2025-12-30T12:21:58+5:302025-12-30T12:22:14+5:30
Pune Mahanagarpalika Elections 2026 निवडणूक प्रक्रियेत कोणताही दबाव, दहशत किंवा गुन्हेगारी हस्तक्षेप होऊ नये यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत

PMC Election 2026: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पुणे पोलिसांची कडक नजर; आतापर्यंत साडेपाच हजारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पुणे : पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक तयारी केली आहे. आतापर्यंत शहरात तब्बल साडेपाच हजारांहून अधिक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, निवडणूक प्रक्रियेत कोणताही दबाव, दहशत किंवा गुन्हेगारी हस्तक्षेप होऊ नये यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
सध्या पुणे महापालिकेच्या निवडणुका रंगात आल्या असून, काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यदेखील निवडणूक लढवत असल्याने शहरातील मध्यवर्ती आणि काही संवेदनशील भागांत तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे.
गुन्हेगार उमेदवार, त्यांचे समर्थक तसेच त्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रभागांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मतदारांवर थेट अथवा अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
याशिवाय संवेदनशील भागांत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, सोशल मीडियावरून दहशत निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ व संदेशांवर सायबर पथकाची विशेष नजर असणार आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे किंवा प्रचारात दबाव निर्माण करणारे घटकही पोलिसांच्या रडारवर राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.