PMC Elections 2026: आज ठरणार पुणे महापालिकेचे कारभारी; ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १ हजार १५३ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 07:15 IST2026-01-15T07:10:06+5:302026-01-15T07:15:01+5:30
- मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते सांयकाळी ५:३०

PMC Elections 2026: आज ठरणार पुणे महापालिकेचे कारभारी; ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १ हजार १५३ उमेदवार रिंगणात
पुणे :पुणे महापालिकेचा रणसंग्राम अखेर अंतिम टप्प्यात आला असून, आज गुरुवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० यादरम्यान मतदान होणार आहे. त्यामधून पुण्याचे कारभारी ठरणार आहेत. ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १ हजार १५३ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी ९३२ ठिकाणी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात ९०६ संंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैनात करून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५ मधील भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. पुणे पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. काँग्रेस व उद्धवसेना - मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे १७४ मतदान केंद्रे प्रभाग क्र. ९ बाणेर - बालेवाडी-पाषाण येथे, तर प्रभाग क्र. ३९ अप्पर-सुप्पर इंदिरानगरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६८ मतदान केंद्रे आहेत. १४ हजार ८६० मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), तर ६ हजार ०४६ कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये महिला मतदान केंद्रे आणि प्रत्येक प्रभागामध्ये आदर्श मतदान केंद्रे प्रत्येकी दोन केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई असणार आहेत.
व्होटर स्लीपचे वाटप ८५ टक्के
सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ, आदी माहितीच्या व्होटर स्लीपचे पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून वितरण वाटप करण्यात येत आहे. व्होटर स्लीप वाटपाची प्रक्रिया ८ जानेवारीपासून सुरू असून, आतापर्यंत ८५ टक्के वाटप पूर्ण झाले आहे.
४५ रुग्णवाहिका सज्ज
महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे रुग्णवाहिकेसह १५ वैद्यकीय पथके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी पालिकेच्या १५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयाकडे बूथनिहाय स्टाफ, नर्स आणि आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली.
...असे राेखणार दुबार मतदान
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दुबार मतदारांची नावे तब्बल ३ लाख ४४६ आहे. दुबार मतदारांच्या यादीनुसार महापालिकेचेे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार इथे मतदान करणार असेल तर अर्ज भरून घेत आहेत. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास तेथे मतदान केले म्हणून शिक्का मारला जाणार आहे.
मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन नेता येणार नाही
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.