PMC Elections 2026 : भाजपमध्ये उमेदवारीवरून हास्यजत्रा; पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर – सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:29 IST2026-01-01T17:26:00+5:302026-01-01T17:29:34+5:30
दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात विजयस्तंभाला अभिवादन करून केली जाते.

PMC Elections 2026 : भाजपमध्ये उमेदवारीवरून हास्यजत्रा; पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर – सुषमा अंधारे
कोरेगाव भीमा : भाजपकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी देण्याचे प्रकार सुरू असून, उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने सध्या राजकारणाची हास्यजत्रा सुरू आहे. त्यामुळे भाजप फुटीच्या उंबरठ्यावर असून, त्याची पहिली लक्षणे या निवडणुकीतून दिसत आहेत, असा आरोप उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
कोरेगाव भीमा येथे २०८व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात विजयस्तंभाला अभिवादन करून केली जाते. येथील शूरवीरांना आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करून वर्षभरातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळावे, हीच त्यामागील भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ज्या भाजपसोबत अजित पवारांनी घरोबा केला आहे, त्या भाजपमध्ये बलात्कारी, तडीपार, भ्रष्टाचारी अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींचा भरणा असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपसोबत असाल तर कोणालाही निवडून आणता येते, कारण साम, दाम, दंड आणि ईव्हीएमसारख्या सर्व यंत्रणा आपल्या हातात आहेत, असा गैरसमज भाजप नेतृत्वाचा झाला असून, त्यामुळे जनतेच्या मताचा आदर न करता राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले जात असल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी देणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र पुण्यात बापूसाहेब पठारे यांच्या मुलासह सुनेला उमेदवारी देण्यात आली, ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची थट्टा असल्याचे अंधारे यांनी नमूद केले.
भाजपची भूक इतकी मोठी आहे की पक्षात इतक्या लोकांना प्रवेश देण्यात आला की, घर बांधणाऱ्यांनाच घराबाहेर काढण्याची वेळ भाजपवर आली आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच जर गुन्हेगारांना अभय देण्यासाठी पुढे सरसावत असतील, तर गुन्हेगारीबाबत पोलिसांना दोष देऊन काहीही उपयोग नसल्याचेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.