PMC Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप-राष्ट्रवादीचा जोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:01 IST2026-01-06T12:00:28+5:302026-01-06T12:01:40+5:30
पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत.

PMC Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप-राष्ट्रवादीचा जोर
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. पण, शहरात केवळ भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जाहीर प्रचार करण्याची मुदत १३ जानेवारीला सायंकाळी ५:०० वाजता संपणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी राहिला आहे. सर्वपक्षीय उमेदवार आणि अपक्ष सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार करून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी उमेदवार थेट घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर भर देत आहेत. प्रभागातून लाऊडस्पीकर्स असलेल्या रिक्षा फिरत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी यांची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार)चे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात ठाण मांडून आहेत. राष्ट्रवादीच्या प्रचारयंत्रणेवर ते लक्ष ठेवून आहेत.
बाणेर येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभाऱ्यांनी शहराचे कसे वाटोळे केले? यावर भाष्य करून त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपने प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आणले होते. चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात ठाण मांडून आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा बाणेर येथे झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कात्रज चौकात जाहीर सभा झाली. उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या नेत्यांच्या जाहीर सभा आतापर्यंत झाल्या आहेत.