PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:19 IST2026-01-10T11:18:32+5:302026-01-10T11:19:38+5:30
हा जाहीरनामा कागदापुरता मर्यादित राहणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणेकरांना दिला.

PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
पुणे - पुण्यासाठी पाणी, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व मुद्द्यांवर ठोस काम करण्याची माझी तयारी आहे. हा जाहीरनामा कागदापुरता मर्यादित राहणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणेकरांना दिला.
पुण्यात पाण्याच्या समस्येसाठी यापूर्वी २ हजार ८१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले, मात्र अद्याप अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवण्यात आलेल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पाण्याच्या ३३ मिसिंग लिंक एकत्रित करून पुण्याची पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
वाहतूक कोंडीमुळे हजारो कोटींचे नुकसान
अजित पवार म्हणाले की, वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. वाहतूक कोंडीमुळे दरमहा साडेसात कोटी रुपयांचे इंधन वाया जाते, तर वर्षाला तब्बल १० हजार ८०० कोटी रुपयांचा फटका पुणेकरांना बसतो. यावर उपाय म्हणून पीएमपीएमएल बस आणि मेट्रो मोफत करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी पुणे महापालिकेला दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपये द्यावे लागतील, मात्र वाहनसंख्या कमी झाल्याने प्रदूषणात मोठी घट होईल, असा दावा त्यांनी केला.
स्वच्छता, पर्यावरण आणि आरोग्यावर भर
“स्वच्छतेची मला विशेष आवड आहे. लोकांना आकर्षित केल्याशिवाय स्वच्छतेत बदल होत नाही,” असे सांगत पुणे स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणेकर पर्यावरण आणि प्रदूषणाबाबत जागरूक असल्याचे सांगत, शहराचा बकालपणा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
पुण्याची लोकसंख्या सुमारे ६० लाखांहून अधिक असताना आरोग्य सुविधांमध्ये आणि रुग्णालयांतील बेड्सची संख्या अपुरी असल्याची टीका त्यांनी केली. “शिक्षण आणि आरोग्य सुविधा देऊ शकत नसेल तर पालिकेचा काही अर्थ नाही,” असे ते म्हणाले.
सुरक्षित पुण्यासाठी सीसीटीव्ही आणि पोलीस यंत्रणा
पुणे सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही नेटवर्क आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल. आतापर्यंत सर्वाधिक पोलीस भरती आणि सीसीटीव्ही पुण्यालाच दिल्याचा दावा करत, सत्ता आल्यावर गुन्हेगारी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
“एकदा विश्वास टाका”
“विधानसभेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. पुणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जे होऊ शकत नाही ते स्पष्टपणे सांगतो,” असे म्हणत त्यांनी पुणेकरांना भावनिक साद घातली. “पुणे हे आमचं होम टाऊन आहे. बाहेरचे लोक इथे तात्पुरते येतील, पण आम्हाला पुण्याबद्दल जिव्हाळा आहे. पुढच्या पाच वर्षांत ही सर्व कामे करून दाखवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.