PMC Elections 2026 :ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेले उमेदवार बापू मानकर चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:13 IST2026-01-03T15:12:43+5:302026-01-03T15:13:28+5:30
- उमेदवारांच्या महागड्या गाड्यांच्या चर्चेत ‘या’ उमेदवाराच्या नावावर केवळ रुग्णवाहिका

PMC Elections 2026 :ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेले उमेदवार बापू मानकर चर्चेत
पुणे - आलिशान गाड्या आणि झगमगाटाची चर्चा निवडणुकांच्या काळात नेहमीच ऐकू येते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यावर अनेक उमेदवारांच्या महागड्या गाड्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्यात प्रभाग २५ मधील उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या नावावर असलेले एकमेव चारचाकी वाहन लक्ष वेधून घेत आहे आणि ते म्हणजे रुग्णवाहिका...
उमेदवारी अर्जासोबत घोषित केल्यानुसार बाप्पु मानकर यांच्या नावावर कोणतीही आलिशान चारचाकी नसून, त्यांनी केवळ एक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांच्या सेवेत ही रुग्णवाहिका कार्यरत असते. राघवेंद्र मानकर हे भाजपाच्यावतीने प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथून निवडणूक लढवत आहेत.
रुग्णवाहिकेसोबतच त्यांच्या नावावर एक दुचाकी वाहन आहे. दैनंदिन कामकाजासाठी ते प्रामुख्याने दुचाकीचाच वापर करतात. आलिशान गाड्या आणि ताफ्यांच्या राजकारणात हा साधेपणाचा दृष्टिकोन चर्चेचा विषय ठरत आहे.
याबाबत बोलताना बाप्पु मानकर म्हणाले, गुढीपाडव्याला वाहन खरेदीची परंपरा आहे. २०२३ साली आम्ही रुग्णवाहिका खरेदी केली आणि तीच माझ्या मालकीची एकमेव चारचाकी आहे. रुग्णसेवेच्या कामासाठी तिची आवश्यकता होती. यापुढेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सेवेसाठीच वाहन खरेदी करण्याचा मानस आहे. एक दुचाकी आहे, आणि शक्य तिथे त्यावरच फिरतो. त्यामुळे लोक भेटतात, प्रश्न समजतात. लांबच्या प्रवासासाठी मित्रांच्या वाहनांची मदत घेतो.